August 19, 2022

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार

Read Time:3 Minute, 24 Second

परभणी : शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्यावर अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीस कृषीमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपिस्थत होते. या संदर्भात आ.डॉ.राहूल पाटील यांनी शालेय व माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमात कृषी विषय अनिवार्य करावा अशी मागणी करीत पाठपुरावा केला होता. शासनाने या पार्श्वभुमीवर कृषी विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतल्याने आ.डॉ.पाटील यांच्या मागणीला यश आले आहे.

भारत हा कृषी प्रधान देश असून देखील शालेय व माध्यमिक शिक्षणामध्ये कृषी विषय नाही याची खंत युनिर्व्हसिटी ग्रँट कमिशन २०१७च्या अहवालात व्यक्त केली होती. या अहवालानुसार उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावर १ कोटीपेक्षा जास्त म्हणजे ३६ टक्के मुले कला शाखेत, त्या पाठोपाठ विज्ञान शाखेत १९ टक्के तर वाणिज्य शाखेत १६ टक्के विद्यार्थी शिक्षण घेतात. कृषी शाखेत शिक्षण घेणा-या मुलांचे प्रमाण केवळ ०.१३ टक्के आहे.शासनाच्या या निर्णयामुळे हे प्रमाण ३ टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे देशाच्या जीडीपीमध्ये कृषी पेक्षा व्हेटरनरीकडून येणा-या जिडीपीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शालेय शिक्षणात कृषी विषयाचा अंतर्भाव केल्यास कृषी व कृषी संलग्न व्यवसाय ज्यामध्ये फुलशेती, मत्स्य शेती, मधुमक्षीका पालन, पोल्ट्री इत्यादींचे शिक्षण सुरूवातीपासून मिळाल्याने अर्थार्जन वाढण्यास मदत होईल. तसेच शालेय स्तरापासून कृषी विषयाचा समावेश केल्यास कृषी क्षेत्राशी निगडीत कुशल मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध निश्चित मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × two =

Close