शहीद जवान चापोलकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Read Time:2 Minute, 24 Second

चाकूर : तालुक्यातील जानवळ येथील सुपुत्र वीर जवान मच्छींद्रनाथ नामदेवराव चापोलकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी पंचक्रोशीतील उपस्थित हजारो लोकांनी साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला. भारत माता की जय,वीर जवान अमर रहे, वंदे मातरम् आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी चाकूर पोलिस पथकाने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून शहीद जवानास मानवंदना दिली.

दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले होते. बारा वर्षांचा मुलगा निरज यांनी वडीलांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला तेंव्हा उपस्थित सर्वांच्याच अश्रुंचे बांध फुटले. वीर जवान मच्छींद्रनाथ यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. यावेळी खासदार सुधाकरराव श्रृंगारे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार विनायकराव पाटील, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (आय पी एस) निकेतन कदम, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, एस. व्ही. घोंगडे, बी. टी. चव्हाण, रोहिदास वाघमारे, गुणवंत पाटील यांनी तसेच पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. दि १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात उपचारामुळे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव न्यू दिल्ली येथून विमानाने हैद्राबाद येथे आणण्यात आले. तेथून सैनिक वाहनातून रस्ता मार्गे जानवळ येथे शहीद जवानाचे पार्थिव आले. याप्रसंगी पंचक्रोशीतील हजारो पुष्पांजली अर्पण करून शेवटचा निरोप दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 − 2 =