शतायुषी शिवऋषी हरपला

Read Time:7 Minute, 56 Second

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकथन अतिशय प्रभावीपणे करणारे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सोमवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या रूपाने एक शतायुषी शिवऋषी हरपला, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी त्यांच्या कोथरूड येथील घरी तोल जाऊन पडल्याने बाबासाहेबांना दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना २० दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाल्याने प्रकृतीची गुंतागुंत वाढली होती. त्यामुळे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यावेळी अंतिम दर्शन घेण्यासाठी पर्वती येथील वाड्यावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांचे जीवन इतिहास आणि संशोधनासाठी समर्पित केले होते. २०१९ मध्ये त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, आणि २०१५ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिवऋषीला मुकलो आहोत. कठोर परिश्रमाने आणि प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहोचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली.
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे असे होते. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जात असे. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते १९४१ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात ते सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली-सन १७४० ते १७६४ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी विपूल लेखन केले असून, त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या तर १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.
घराघरांत पोहोचवली
शिवाजी महाराजांची कथा
शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम घेतले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतूनच जाणता राजासारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली.
कधीही भरून न निघणारी
पोकळी निर्माण झाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले आहे. शब्दांमध्ये मांडता येणार नाही असे दु:ख मला झाले. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी केलेले इतर कामही कायमच स्मरणात राहील, असे पंतप्रधान म्हणाले.

असा अलौकिक शिवआराधक होणे नाही
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राचे मोठे नुकसान
थोर इतिहासकार, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना करण्यासाठी वाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ््या स्वरूपात त्यांनी केलेला अभ्यास, संशोधन, संदर्भ आपणासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × four =