July 1, 2022

व्यसनमुक्ती जनजागृतीसह तंबाखू सेवन विरोधी चळवळीचा ध्यास

Read Time:5 Minute, 56 Second

परभणी (सुधीर गो. बोर्डे) : आपल्या देशात मुख कर्करोगाचे मोठे प्रमाण आहे. या आजाराचे लवकर निदान झाल्यास व वेळीच योग्य ते उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी दंत वैद्याकडे वेळोवेळी जावून तपासणी करणे आवश्यक असल्याची माहिती शहरातील दंतवैद्य डॉ.संजीवनी श्रीकृष्ण कात्नेश्वरकर यांनी नवरात्रोत्सवाच्या मुलाखती दरम्यान बोलताना दिली. त्या गेल्या ३१ वर्षांपासून दंतवैद्यक म्हणून कार्य करीत असून त्यांनी व्यसनमुक्ती जनजागृतीसह तंबाखू विरोधी चळवळ चालविली आहे.

पुढे बोलताना डॉ.सौक़ात्नेश्वरकर म्हणाल्या, माहेर औरंगाबाद येथील असून वडील डॉ.नारायणराव बीडकर व आई डॉ.सौ.शोभना बीडकर दोघेही डॉक्टर. त्यामुळे लहान पणापासून रूग्णसेवेचे बाळकडू मिळाले. दोन मोठ्या बहिनी औरंगाबाद येथे वैद्यकीय सेवेत असून एक बहिण ऑस्ट्रेलियात उच्च पदावर कार्यरत आहे. तर लहान भाऊ डॉ.अनंत बीडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्जरी विभागात प्रोफेसर आहेत. शालेय शिक्षण शारदा भुवन व सरस्वती भूवन प्रशालेतून झाले. दंतवैद्यक शास्त्रातील बी.डी.एस. शिक्षण शासकीय दंत महाविद्यालय औरंगाबाद येथून १९८६मध्ये प्रथम क्रमांकाने पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथून ओरल मेडीसीन आणि रेडीऑलॉजी या विषयात पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९८९ साली एम.एस. सर्जन व पोटाचे विकार तज्ञ असलेल्या डॉ.श्रीकृष्ण कात्नेश्वरकर यांच्याशी विवाह झाला. पती सोबतच १९९० पासून वैद्यकीय सेवा सुरू केली आणि नकळत परभणी शहरातील पहिली महिला डेंटीस्ट होण्याचा मान मिळाला. मोठी मुलगी सौ.नंदिनी कॉम्प्युटर इंजिनिअर, एमबीए असून जावई श्री.शौनक गुगल व अ‍ॅमझॉनमध्ये इंजिनिअर आहेत. दुसरी मुलगी सौग़ीतांजली एम.एस.सर्जन असून जावई हृदयरोग तज्ञ आहेत. मुलगा एमबीबीएस असून एम.एस.सर्जरीसाठी प्रवेश मिळवत असल्याचे सांगितले.

परभणी शहरात वैद्यकीय सेवेस प्रारंभ केल्यानंतर इंडीयन डेंटल असोसिएशनच्या परभणी शाखेची स्थापना करून सर्वांना एकत्र आणले. या शाखेची अध्यक्षा म्हणून काम करताना विविध चर्चासत्रांचे आयोजन केले. तसेच आकाशवाणीवर दंतआरोग्य व मौखिक कर्करोगावर व्याख्याने देण्यासह जनजागृती करण्याचे काम केले. याशिवाय शाळांमधून दंत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यासह विद्यार्थ्यांना मोफत दंत साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. वृक्षारोपनाची आवड असल्याने घराच्या परीसरात ३० नारळांच्या झाडांसह अन्य वृक्ष लावले आहेत. यासाठी घरीच सेंद्रीय खत तयार करून या झाडांना दिले जाते. वायसीएमओयू विद्यापीठाची डी.योग ही पदवी मिळवली असून योगाच्या प्रचार व प्रसाराचे काम चालू आहे. शास्त्रीय संगीताच्या ४ परीक्षा दिल्या आहेत. आयएमए संगीत स्पर्धेत विभागीय पातळीवर गायन कलेत प्रथम क्रमांकाचे पारितोषक मिळाले आहे. या सर्व कार्यात आई-वडील व सासूबाई श्रीमती सरलाताई कात्नेश्वरकर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच पावलोपावली पती श्रीकृष्ण कात्नेश्वरकर यांची साथअसल्यामुळे सामाजिक कार्य करणे शक्य होत असल्याचे डॉ.सौक़ात्नेश्वरकर यांनी सांगितले.

आपले तोंड हे आपल्या शरीराचा आरसा आहे. तोंड पाहून कित्येक आजारांचे निदान होऊ शकते. लहानपणापासून दातांची योग्य निगा राखल्यास आयुष्यभर प्रकृती उत्तम राहण्यास मदत होते. दातांमुळे अन्नाचे चर्वण होवून त्यात पाचक रस मिसळून पचन सुलभ होण्यास मदत होत असते. त्यामुळे दाताला किड लागल्यास, हिरड्यांचे विविध विकार, तोंडाची दुर्गंधी येत असल्यास वेळीच तज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत. मुख कर्करोगाचे कारण गुटखा, तंबाखू, सिगारेट यांचे सेवन असल्याने या सर्व व्यवसनांपासून दूर राहून आपले आरोग्य चांगले ठेवावे, असे आवाहन डॉ.सौक़ात्नेश्वरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine + thirteen =

Close