वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ, आरोग्य विभागात १५ हजार पदांची भरती

Read Time:4 Minute, 6 Second

मुंबई,दि.१४ (प्रतिनिधी) कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेले आरोग्यसेवक उपलब्ध असावेत यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्ष करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात साडेपंधरा हजार जणांची भरती करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवेतील गट- अ तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची नितांत आवश्यकता आहे. त्यांचा अनुभव साथरोग नियंत्रणात महत्वाचा ठरु शकतो.

याचा विचार करुन शासनाकडून वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ यांचे निवृत्तीचे वय ३१ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षासाठी ६२ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयास कार्योत्तर मंजुरी देण्याचा तसेच त्याअनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियमात आवश्यक ती सुधारणा करण्यासमंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे टोपे यांनी सांगितले. यापूर्वी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वर्ष होती. नंतर ती ६० वर्ष करण्यात आली, व आता ६२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आरोग्य विभागात साडेपंधरा हजार जणांची भरती
कोरोना संकट काळात वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात साडेपंधरा हजार जणांची भरती करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. यात गट अ ते गट क या विभागातील एकूण १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार असल्याचं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. याशिवाय पुढील तीन ते चार दिवसात १ हजार डॉक्टरांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

five + fourteen =