August 9, 2022

वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही..!,नांदेडातील गोवर्धनघाटावर दिवसाला १९ मृतदेह, तर मसनजाळी केवळ बारा

Read Time:4 Minute, 15 Second

जन्मापासून ते मरणापर्यंतचा प्रवास ‘पुर्तता माझ्या व्यथेची’ या कवितेतून सुरेश भट यांनी मांडलेल्या ओळी आज नांदेड शहरात तंतोतत जुळत असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या कोरोनामुळे वाढलेली मृत्यू संख्या आणि गोवर्धन घाटावरील स्मशानात उपलब्ध असलेली चिता जाळण्याची मसनजाळी यांची असलेली कमतरता मृत्यूनंतर प्रेत जाळण्यासाठी तासनतास वाट पहावी लागत असल्याचे वास्तव मागील चार दिवसांपासून दिसून येत आहे. यावरुन ‘वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही..!’ अशी स्थिती झाली असून यातून मुक्तता कधी मिळणार? याची प्रतिक्षा लागली आहे.

कोरोना महामारीमुळे संबंध मानव जातीचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. जगण्या, मरण्याचे देखील प्रश्‍न गंभीर होत आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहाला घराची चौकट ओलांडण्याची देखील परवानगी नाही. त्यामुळे रुग्णालयातून मृतदेह थेट स्मशानात घेऊन जावा लागतो. मात्र, घाईगडबडीत आणल्या गेलेल्या मृतदेहाला सरणावर जाण्यासाठी देखील पाच ते सहा तास वाट बघावी लागत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

मृत्यू संख्येत वाढ

गोदावरी नदी काठावर असलेल्या गोवर्धनघाट या मुख्य स्मशानभूमीसह, रामघाट, मरघाट, सिडको, डंकीन अशा ठिकाणी अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. परंतु त्या ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी पुरेशा सुवीधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नेहमी गोवर्धनघाट स्मशानभूमीकडेच सर्वांचा ओढा असतो. या ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी एकुण १२ मसनजाळ्या आहेत. त्यापैकी सहा जाळ्या कोरोना पॉझिटिव्हने मृत्यू झालेल्या मृतदेह जाळण्यासाठी तर उर्वरित सहा जाळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

स्मशानभूमीत अंत्यविधिसाठी जागा शिल्लक  नाही

परंतु जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोबतच मृत्यूदरही वाढला आहे. मागील चार दिवसापासून जिल्ह्यात दिवसाला आठ ते दहा पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू होत आहे. या शिवाय शहराच्या इतर भागातील नागरीक देखील मृतदेह घेऊन अंत्यविधीसाठी गोवर्धन घाटावर येत आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधिसाठी जागा शिल्लक नसल्याने त्यांना इतर ठिकाणच्या स्मशानभूमीत जाण्याचा सल्ला दिला जात आहे.

‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूतून व्हावी

एक मृतदेह जाळण्यासाठी किमान तीन ते साडेतीन क्वींटल सरपन (लाकडे) लागतात. मृतदेह आणि लाकडे जाळण्यासाठी किमान चार तासाचा वेळ लागतो. त्यामुळे किमान चार तासापर्यंत ताटकाळत बसण्याची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणूनच ‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूतून व्हावी. जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्तता मिळावी’ असे म्हण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

9 − 1 =

Close