
विद्युतीकरणावर चालणाऱ्या कारची शेतकरी कुटुंबाने केलीय खरेदी – सर्वत्र कौतुक
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या वाहनामुळे पर्यावरणालाही धोका पोहचत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही इंधनाऐवजी विद्युतवर चालणारी वाहन खरेदी करण्याचे आवाहन सातत्याने करत आहेत. अनेक दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. मात्र चारचाकीकडे सर्वसामान्यांचा कल दिसून येत नव्हता. पार्डी ( म.) ता. अर्धापूर येथील देशमुख या शेतकरी कुटुंबाने इंधना ऐवजी विद्युतीकरणावर चालणारी कार खरेदी केली आहे. एका शेतकरी कुटुंबाने पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पार्डी म. (ता. अर्धापूर) येथील विठ्ठलराव देशमुख यांचे एकत्र कुटुंब असून त्यांनी आधुनिक शेतीच्या माध्यमातून चांगली आर्थिक प्रगती केली आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अनेक शेतकरी जोडले आहेत. विविध माध्यमातून शेतकरी सक्षम होऊन त्यांच्या इच्छा- आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. पर्यावरणाची काळजी नेहमीच शेतकरी घेत असतो. त्यामुळे हाच हेतू समोर ठेवून विद्युत वाहिनीवर चालणारी कार त्यांनी खरेदी केली आहे. ही कार एकदा चार्जिंग केल्यानंतर जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास करता येतो. तब्बल १६ लाख ४० हजार रुपये खर्चून ही कार एका शेतकऱ्याने खरेदी केल्यामुळे त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील त्यांचे मोठे बंधू गंगाधरराव देशमुख, पुतणे गजानन देशमुख, सुदर्शन देशमुख, मुलगा अनिल देशमुख हे सर्व उपस्थित होते.
इंधनावर चालणारी वाहने कोणी पण खरेदी करु शकतो. पण मी एक शेतकरी म्ह्णून करंटवर चालणारी गाडी मी माझ्या आयुष्यात खरेदी करावी. अशी मनस्वी इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. आणि या गाडीमुळे पर्यावरणाचे रक्षण होणार असून तेवढंच एक सामाजिक कामही या माध्यमातून होत आहे. याचाही मला आनंद देणारा आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी विठ्ठलराव देशमुख यांनी यावेळी दिली.