
वानखेडेंच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या दाव्यावर उद्या सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, वानखेडे यांच्या संदर्भात काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती नवाब मलिक यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केले होते. वानखेडे हे बड्या घरातील लोकांना व बॉलिवूडमधील लोकांना बोगस ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून वसुली करतात, असा दावा मलिक यांनी केला होता. तसेच काही पुरावेही समोर आणले होते. त्याचबरोबर समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवताना घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांचे कुटुंब मुस्लिम असल्याचे व त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे मलिक यांनी निदर्शनास आणले होते. त्यामुळे वानखेडे कुटुंब चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. मलिक यांच्या या आरोपांविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेत सव्वा कोटी रुपयांचा दावा केला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली व न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना आपापल्या म्हणणे सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधी काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न आहे.
समीर वानखेडे यांना मुंबई महापालिकेने दिलेल्या जन्मदाखल्याची प्रत, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे मलिक यांना सादर करायची असल्याचे समजते. त्या आधारे समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिमच आहेत, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.