January 19, 2022

वाढते हवा प्रदूषण, जनुकांमुळे नैराश्येचा धोका

Read Time:3 Minute, 28 Second

वॉशिंग्टन : हवा प्रदूषण तसेच जनुकांमुळे नैराश्याचा धोका वाढतो असे एका संशोधनात दिसून आले आहे. काही लोकांमध्ये जनुकीय परिस्थिती आधीच नैराश्याला अनुकूल असते व त्यात प्रदूषणामुळे भर पडते, असे या अभ्यासातून दिसून आले आहे. अलिकडे प्रदूषणाचा धोका वाढला आहे. त्याचा थेट मानवी शरीरावर परिणाम होत
असून, यातूनच नैराश्य वाढत असल्याची भीती या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली.

पीएनएएस नियतकालिकाने प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की, हवा प्रदूषण, मेंदूचे प्रतिमा चित्रण, मेंदूतील जनुकांचे आविष्करण हे सगळे घटक यात महत्वाचे असून त्यांचा या संशोधनात विचार करण्यात आला. एकूण ४० देशांच्या इंटरनॅशनल जेनेटिक कन्सोर्टियम या संस्थेने पुरवलेल्या माहितीचा वापर करण्यात आला आहे. या संशोधनाबाबत अमेरिकेतील लायबर इन्स्टिट्यूूट फॉर ब्रेन डेव्हलपमेंट या संस्थेचे हाव यांग तान यांनी याबाबत माहिती दिली.

हवा प्रदूषणामुळे मेंदूतील आकलन, भावना याबाबतच्या चेतापेशींच्या जोडण्यांवर विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे जनुकांचे आविष्करण बदलून ते नैराश्यास अनुकूल बनते. जास्त प्रदूषण असलेल्या भागातील लोकांना नेहमीच नैराश्याचा अनुभव येत असतो. कारण प्रदूषणामुळे त्यांची जनुके बिघडतात व त्यांचे वर्तन विपरित होऊ लागते. असे असले तरी प्रत्येकावर तसेच परिणाम दिसतील असे नाही. लोकांमध्ये नैराश्याची वाढ होण्यास अनेक कारणे असू शकतात. पण जनुकांचे आविष्करण त्यात महत्वाची भूमिका पार पाडते.

यासंंबंधी चीनमध्ये अभ्यास करण्यात आला आहे. विशेषत: चीनची राजधानी बीजिंगमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात सर्वाधिक प्रदूषण असलेले शहर म्हणून बीजिंगची ओळख आहे. या शहरात यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात शहरातील ३५२ जणांचा समावेश होता. त्यांच्याशी चर्चा करून झालेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला. ही खरोखरच चिंताजनक बाब असून, वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात सर्वच देशांनी याला बळ दिले पाहिजे, अन्यथा वाढत्या प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर भविष्यात आणखी विपरित परिणाम दिसून येऊ शकतात, अशी भीती या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × five =

Close