August 19, 2022

वर्षा ऋतूतील आरोग्यमंत्र

Read Time:8 Minute, 40 Second

पावसाच्या सरी कोसळू लागल्या की वातावरणात एक सुखद गारवा पसरतो. मन उल्हासित होते; परंतु या दिवसातील हवामानबदलांचा आरोग्यावर परिणाम होत असतो. तसेच साचलेल्या पाण्यामुळे अनेक रोगांचाही फैलाव होत असतो. या पार्श्वभूमीवर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात पचनक्रियाही कमकुवत बनलेली असते. त्यामुळे आहारामध्येही अनेक बदल करावे लागतात. मधुमेही, अस्थमाग्रस्त रुग्ण, वृद्ध व्यक्ती आणि मुलांनी या दिवसात प्रकृतीची अधिक देखभाल घेण्याची गरज असते.

आयुर्वेदानुसार पावसाळा हा ऋतू वातप्रकोप आणि पित्त संचयाचा काळ असतो. यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत असते. पोट आणि पोटाशी संबंधित असणारे बहुतेक आजार पावसाळ्यातच होतात. थोडेसे दुर्लक्ष केले तरीही या ऋतूत आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यात टायफॉईड, डायरिया, कावीळ, व्हायरल आणि सर्दी पडसे हे आजार सर्वसामान्य आहेत. पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होते यामुळे चिकुन गुनिया, मलेरिया, डेंग्यु यासारख्या आजारांचा प्रकोप वाढतो. खाणे पिणे आणि जीवनशैली नियंत्रित करून आपण या आजारांपासून दूर राहू शकतो. पावसाळ्यापूर्वी उन्हाळा असल्यामुळे आपली पचनक्रिया कमकुवत झालेली असते. यामुळे भोजनासोबत पोटात जाणारे जीवाणू पावसाळ्यात सक्रिय होऊन हळूहळू आजाराचे रूप घेतात. आणि शरीरात त्याचे संक्रमणही पसरते. या काळात डासांमुळे होणा-या आजारांमुळे दरवर्षी हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. मलेरिया, डेंग्यु, चिकन गुनिया यासारख्या आजारात अधिक ताप थंडी वाचून येणे, स्रायूंमध्ये वेदना होणे, अशक्तपणा यासारखी लक्षणे दिसतात. या रोगांपासून बचाव करण्यासाठी घरात मच्छरांपासून बचाव करणारी साधने असणे गरजेचे असते. घराच्या आजूबाजूला पाणी साठलेले नसावे. पाणी साचले असेल तर रॉकेल किंवा किटकनाशक फवारावीत. डास घालवण्यासाठी वनस्पती तेलाचाही वापर करता येऊ शकतो. आजारी पडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

या ऋतूत सावध रहावे. कारण पावसाळ्यात कॉलरा हा एक सामान्य आजार असतो. प्रदुषित पाण्यापासून होणारा हा आजार आपल्या पचन क्रियेवर परिणाम करतो. या आजारात तीव्र अतिसार होतो. उलट्या होतात यामुळे हळूहळू शरीरातील पाणी कमी होत जाते. रूग्णाला डीहायड्रेशन होते. यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की कॉलराची साथ येते. या आजारापासून बचाव करण्यासाठी घर आणि घरासभोवताली स्वच्छता ठेवावी, नेहमी स्वच्छ पाणी प्यावे. या ऋतूत उकळलेले पाणी पिणे अधिक लाभदायक ठरते. उलटी होत असेल तर शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी जास्त पाणी प्यावे. त्याचबरोबर ओ. आर. एस. चे मिश्रणही प्यावे. खास करून लहान मुलांना हे पाणी द्यावे. पावसाळ्यात खाण्या-पिण्याच्या बाबतीत थोडेसे दुर्लक्ष झाले तर टायफॉईड या आजाराची तक्रार उद्भवू शकते. यामध्ये यकृतापर्यंत संक्रमण पोहोचते. दूषित पाणी आणि दुषित अन्नामुळे हा आजार होतो. टायफॉईड हा वेगाने पसरतो घरातील एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला असल्यास त्याच्या खाण्या-पिण्याची भांडी वेगळी ठेवावी. यामध्ये अधिक जास्त ताप, पोट दुखी, डोके दुखी, पोट साफ न होणे यासारखी लक्षणे दिसतात.

या आजारावर जवळपास दोन आठवड्यांपर्यंत इलाज करावा लागतो. इलाजादरम्यान, औषधांचा कोर्स पूर्ण केला नाही तर आजार पुन्हा उलटण्याची शक्यता असते. थंडी, ताप आणि कप हा आजार देखील या ऋतूत होत असतो. हा आजार कुठल्याही व्यक्तीला होऊ शकतो. या दिवसात पावसामुळे उष्णता वाढत आणि कमी होत असते. परिणामी, शरीराचे संतुलन बिघडते. अशातच पावसात भिजल्यास आजारांचा धोका अधिक असतो. यामध्ये लागोपाठ शिंका येणे, घशात खाज सुटणे, दुखणे, ताप येणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसतात. म्हणून वृद्ध व्यक्तींनी तसेच मुलांनी पावसात भिजू नये. घरात अथवा ऑफिसमध्ये एअरकंडिशन असल्यास तोे सामान्य तापमानाला सेट करावा. या दिवसात आईस्क्रिम खाऊ नये. आजाराची लक्षणे दिसू लागली तर रात्री झोपताना गरम दुधात हळद टाकून ते प्यावे. मधुमेह असणा-या रूग्णांनी देखील या ऋतूत काळजी घ्यावी. कारण त्यांच्या पायांना जखम होण्याचा धोका वाढतो. ओल्या मातीत पाय ठेवल्यास त्यामध्ये काचेचे तुकडे किंवा खिळ्यांमुळे बरेचदा जखमा होतात. म्हणूनच मधुमेही व्यक्तींनी बाहेर फिरताना काळजी घ्यावी. अनेक प्रकारचे जीवाणूदेखील या ऋतूत वाढतात. मधुमेही व्यक्तींनी संरक्षणासाठी तिळाच्या तेलाने पायांना मालीश करावी हे तेल जीवाणूनाशक असते.

पावसाळ्यात अस्थमाचा आजारही बळावतो. दमट हवामान असल्यामुळे घरात बुरशीची वाढ होते. चामड्याच्या बुटात अथवा चपलांमध्येदेखील बुरशी वाढते. यामुळे अस्थमा वाढू शकतो. यापासून बचाव करण्यासाठी फर्निचर आणि चामड्याच्या वस्तूंची नियमित स्वच्छता करावी. जेणेकरून बुरशी वाढणार नाही. शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. नियमित व्यायाम करावा. पिंपळी, तुळशी, हळद, मध इत्यादीचे सेवन करावे. पंचकोळ चूर्ण जेवणासोबत घ्यावे. गहू, तांदुळ आणि भाज्यांचे सूप प्यावे. आंबट, खारट आणि तेलकट पदार्थांपासून दूर रहावे. पावसाळ्यामध्ये कारले, कोबी, कोरड्या भाज्या, पालक, मका, बाजरी, कंदमुळे, बटाटे, काकडी, टरबूज, मटण, सुकट खाऊ नये. तर वांगी, दुधीभोपळा, परवल आणि हिरव्या भाज्या यासोबत आले, लसूण, कांदा यांचे सेवन करावे. फळांमध्ये द्राक्ष, लिंबू, आंबे यासोबत मोसमी फळे खावीत. कोरडे नारळ स्वयंपाकात वापरावे. या व्यतिरिक्त दुध आणि दुधापासुन बनलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हिंग, धने, जिरे, गुळ, मिरे, सैंधव यांचादेखील पदार्थांमध्ये वापर करावा. स्वच्छ पाणी प्यावे. शक्य असेल तर उकळून गार केलेले पाणी
प्यावे.

-जान्हवी शिरोडकर

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × four =

Close