July 1, 2022

‘वंचित’चा मोर्चा विधानभवनावर धडकणार

Read Time:2 Minute, 36 Second

औरंगाबाद : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप करत, २३ डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानभवनावर राज्यव्यापी मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के राजकीय आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काढलेला अध्यादेश सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही. तर इम्पिरिकल डेटा देण्यास महाराष्ट्र सरकार असमर्थ ठरल्यामुळे तसेच स्वत:जवळ असलेला डेटा देण्यास केंद्रातील भाजप सरकारने नकार दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप वंचित-बहुजन आघाडीने केला आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारे ओबीसींच्या आरक्षणाबद्दल गंभीर नाहीत. त्यामुळे २३ रोजी विधानभवनावर राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याची माहिती मोकळे यांनी दिली.

वंचितच्या मागण्या काय?
मोर्चा काढताना, ओबीसींची जातनिहाय राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला इम्पिरिकल डेटा देण्यासाठी काही मुदतवाढ द्यावी, ज्यामुळे ओबीसींचे सध्याचे आरक्षण अबाधित राहील. याकरिता महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावेत, या दोन प्रमुख मागण्या असणार आहेत. तसेच ओबीसींमध्ये सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी तसेच आरक्षण टिकवण्यासाठी जो इम्पिरिकल डेटा हवा आहे, यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहितीसुद्धा मोकळे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

five + one =

Close