लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या हिशोब व पुनर्मेळ खर्चाबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक


नांदेड :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 16-नांदेड मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब व त्यांच्या पुनर्मेळ खर्चाबाबतच्या बैठकीचे आयोजन सोमवार 1 जुलै 2024 रोजी कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, कॅबिनेट बैठक कक्ष, तळ मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे केले आहे.

 

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत:/ती स्वत: किंवा त्याच्या, तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तिला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशोब ठेवणे आवश्यक आहे.

 

भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 16-नांदेड मतदार संघातील उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची लेखा पुनर्मेळ बैठक 1 जुलै रोजी आयोजित केली आहे. ज्या उमेदवारांच्या खर्चात तफावत आहे व ज्यांनी ही तफावत मान्य केलेली नाही, त्यांनी बैठकीच्या दिवशी त्यांच्याकडील पुराव्यासह बैठकीस उपस्थित राहावे. तसेच ज्या उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च विहित नमुन्यात अद्याप संनियंत्रण कक्षाला सादर केलेला नाही त्यांनी बैठकीला उपस्थित राहून सादर करावा.

 

विहित नमुन्यात आणि विहित कालावधीत निवडणूक खर्च सादर न करणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमि‍त केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र राहतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


Post Views: 58


Share this article:
Previous Post: भारतीय न्याय संहितेत खून हा प्रकार आता 302 ऐवजी 101 – VastavNEWSLive.com

June 30, 2024 - In Uncategorized

Next Post: पोलीस कन्येची वास्तुशास्त्रात पीएचडी करण्यासाठी निवड

June 30, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.