January 21, 2022

लॉकडाऊन नाही, जिल्हाबंदीही नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Read Time:6 Minute, 35 Second

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी फारच कमी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासते आहे. ऑक्सिजन व हॉस्पिटल बेडची कोणतीही अडचण नाही. त्यामुळे सध्यातरी लॉकडाऊन किंवा मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा बंद करण्याचा कोणताही विचार नाही. तसेच राज्यात कुठेही जिल्हाबंदी केली जाणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवार दि. ६ जानेवारी रोजी स्पष्ट केले.

राजतातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज आरोग्य मंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागातील ज्येष्ठ अधिका-यांशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सरकारने केलेली तयारी, रुग्णसंख्या वाढल्यास कशा पद्धतीने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे? याबाबत पवार यांनी माहिती घेतली. काही सूचनाही दिल्या. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक निर्बंध घाला, या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करा. अत्यावश्यक नसलेल्या सेवांमुळे जर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असेल तर त्याबाबत अधिक कठोर निर्णय घेण्याची गरज भासली तर ते घ्या, असे शरद पवार यांनी सांगितले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली.

रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी दुस-या लाटेसारखी स्थिती निर्माण होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. बुधवारी राज्यात २५ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. आज ही संख्या ३५ हजारांपर्यंत जाऊ शकेल. काल मुंबईत ६० हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या व त्यातील १५ हजार लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. पॉझिटिव्हीटी रेट जवळपास २५ टक्के आहे. परंतु यातील बहुतांश लोकांना कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी केवळ १० टक्के रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

रुग्णसंख्या दुस-या लाटेएवढी असली तरी स्वरूप सौम्य असल्याने रुग्णालयावर ताण येणार नाही. मुंबईत पुरेशा रुग्णशैया उपलब्ध आहेत. ऑक्सीजनची मागणीही वाढलेली नाही. लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असल्याने लोकांची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे अकारण घाबरून जाण्याचे कारण नाही. तिस-या लाटेमध्ये फुफ्फुसापर्यंत विषाणूचा संसर्ग पोहोचत नाही, असे आढळून आले आहे. केवळ घशापर्यंत संसर्ग मर्यादित आहे. घसा नाकापर्यंत लक्षणे आढळतात. घशात खवखव, सर्दी होणे अशी लक्षणे जाणवतात, त्यामुळे चिंतेचे कारण नसल्याचे टोपे यांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात असल्याने सरसकट लॉकडाऊन किंवा मुंबईतील लोकल बंद करण्याबाबत चर्चाही झालेली नाही. जिल्हा अंतर्गत प्रवासावर बंदी घालण्याचाही राज्य सरकारचा विचार नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रात्रीची संचारबंदी व वीक एंड लाँकडाऊनबाबत चर्चा झाली आहे, पण कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील, असे टोपे यांनी सांगितले.

गर्दी रोखण्यासाठी निर्बंध
मुंबई, पुणे, ठाण्यातील शाळा, तसेच राज्यातील महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. पण शाळा काँलेज बंद केल्यानंतर या वयोगटातील तरुण-तरुणी माँल, रेस्टाँरंटमध्ये गर्दी करू लागले तर उद्देश साध्य होणार नाही. याबाबतही आजच्या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. लसीकरण, औषध, निर्बंधांवर चर्चा झाली. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यांमधील संख्येच्या मर्यादेची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सुचना देण्यात आल्या असल्याचे टोपे यांनी सांगितले.

१० जानेवारीपासून लसीचा बूस्टर
राज्यातील ७० ते ८० लाख लोकांनी अजून लसीचा पहिली मात्राही घेतलेली नाही. त्यांनी लस घेतलीच पाहिजे. तसेच पहिली लस घेतल्यानंतर दुस-या लसीची तारीख उलटून गेल्यावरही अनेकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. यांच्या लसीकरणासाठी मोहीम घेण्यात येणार आहे. तसेच फ्रंटलाईन व हेल्थ वर्कर्स, सहव्याधी असलेल्या व्यक्ती व वयाची साठी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना १० जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्यावरही आज चर्चा झाली. खुद्द शरद पवारही तिसरा डोस घेतील असे राजेश टोपे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × three =

Close