August 19, 2022

लुधियाना कोर्ट स्फोटात दोन ठार

Read Time:2 Minute, 31 Second

लुधियाना : पंजाबच्या लुधियाना कोर्टामध्ये भीषण स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार दुपारच्या सुमारास घडला आहे. गुरूवार दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला असून, त्यामध्ये दोन जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यामुळे न्यायालयात स्फोट झालेल्या ठिकाणच्या भितींना तडे गेले, तर बाडूच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. न्यायालयाच्या दुस-या मजल्यावर हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नेमका स्फोट कशामुळे झाला, याविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, न्यायालयाच्या आवारातच नाही, तर थेट न्यायालयाच्या इमारतीमध्ये दुस-या मजल्यावर हा स्फोट झाल्यामुळे यावरून परिसरात खळबळ उडाली आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास न्यायालयाच्या आवारामध्ये अचानक स्फोट झाल्याचा आवाज झाला.

त्यानंतर हा स्फोट न्यायालयाच्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तातडीने हा परिसर बंद केला असून अग्निशमन विभागाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. न्यायालयाच्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नेटिझन्सकडून सोशल मीडियावर स्फोट झालेल्या ठिकाणचे व्हिडीओ ट्वीट केले जात आहेत.

लुधियाना जिल्हा कोर्टाचे हे आवार शहराच्या मध्यभागी असलेल्या जिल्हाधिका-यांच्या कार्यालयाच्या जवळच आहे. त्यामुळे या घटनेचा गांभीर्याने तपास होण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 − 19 =

Close