January 19, 2022

लिलावात ४४ लाखांची बोली लावत मिळाले सरपंच पद

Read Time:2 Minute, 51 Second

भोपाळ : सरपंचपदासाठी निवडणुक न घेता बोली लावत पद विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मध्य प्रदेशातील एका गावातील रहिवाशांनी सर्वाधिक बोली लावणा-याला सरपंचपद विकले आहे. गावातील इतर चार जणांना पराभूत करत एका व्यक्तीने हे पद जिंकले आहे. या व्यक्तीने तब्बल ४४ लाख रुपयांची बोली लावत सरपंचपद जिंकले. ४४ लाखांची अंतिम बोली लावल्यानंतर त्या व्यक्तीची एकमताने सरपंचपदासाठी नेमणूक करण्यात आली.

दुसरीकडे स्थानिक अधिका-यांनी मात्र या पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासह योग्य निवडणूक प्रक्रिया पाळावी लागणार असल्याचे सांगितले. अशोकनगर जिल्ह्यातील भटौली ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी या बोली लावण्याच्या प्रक्रियेला नवीन प्रणाली म्हटले आहे आणि या पदासाठी जे इच्छुक आहेत, त्यांच्यामध्ये कोणताही वाद किंवा तणाव होणार नाही, याची खात्री केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. या पद्धतीमुळे उमेदवार मते जिंकण्यासाठी दारू आणि पैसे वाटणार नाहीत, असा दावा या ग्रामस्थांनी केला आहे.

२१ लाखांच्या मूळ किमतीने सुरूवात
मंदिरात झालेल्या खुल्या लिलावात सौभागसिंग यादव यांची एकमताने सरपंचपदी निवड झाली. यावेळी बोली २१ लाखांच्या मूळ किमतीने सुरू झाली आणि ४३ लाखांपर्यंत पोहोचली. त्यानंतर यादव यांनी ४४ लाखांची अंतिम बोली लावली. जिंकल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व नवीन सरपंच म्हणून त्यांची घोषणा केली. राज्यातील आगामी पंचायत निवडणुकीत त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी दाखल करणार नाही, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. दरम्यान, जर सौभाग यादव ४४ लाख रुपये जमा करण्यात अयशस्वी झाले तर त्यांच्यानंतर सर्वाधिक बोली ज्या उमेदवाराने लावली होती, त्याचा या पदासाठी विचार केला जाईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + fourteen =

Close