लावणीच्या मंचावरून देशभक्तीचा जागर

Read Time:5 Minute, 20 Second

लातूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने दि. २६ ते २८ या कालावधीत येथे तीन दिवसीय लावणी महोत्सव- २०२२ चे आयोजन करण्यात आले. शनिवारी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लावणी महोत्सवाचा शानदार उद््घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर लोककलावंतांनी लावणीच्या मंचावरून सादर केलेल्या देशभक्तीच्या प्रसंगाला अख्ख्या सभागृहाला उभे राहून ‘सॅल्यूट’ दिला. देशभक्तीची उर्मी निर्माण करणा-या या प्रसंगाने सभागृहात कितीतरी वेळ ‘भारत माता की, जय…’चा जयघोष दुमदूमला.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अभिनव कल्पनेतून आजादी का अमृत महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लातूर येथे तीन दिवस लावणी महोत्सव-२०२२ चे आयोजन करण्यात आले. लावणी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, उपसभापती मनोज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, मनपा आयुक्त अमन मित्तल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांची उपस्थिती होती.

बाजार समितीच्या स्व. दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात लावणी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर न्यू अंबिका कलाकेंद्र आणि पार्टी चौफुला, पुण्याच्या कलावंतांनी प्रारंभी गणेशवंदना केली. त्यानंतर संवादिनी आणि ढोलकीची जुगलबंदी आणि त्यावर तब्बल ९ नृत्यांगणांनी नृत्य सादर करीत असतानाच जवानांवर अतिरेक्यांनी केलेला हल्ला व त्यात शहीद झालेले जवान. शहीद जवानांना मानवंदना हा प्रसंग सादर केला. या प्रसंगाने अख्खे सभागृह उठून उभे राहात राष्ट्रगीत गावून देशाची शान असलेल्या तिरंग्याला सलाम केला. हा प्रसंग देशभक्तीचा सर्वोच्च क्षण ठरला. त्यानंतर या कलावंतांनी कान्हा… मन मोहना… कृष्णा मन मोहना… या श्रीकृष्णाच्या लिला दाखवणारी गवळण सादर केली.

त्यानंतर संगीता काळे यांनी आशुका…माशुका… नार नाशिकची ही बहारदार लावणी सादर केली तर सरिता मनेगावर यांनी झाल्या तिन्ही सांजा… ही लावणी सादर केली. सविता जळगावकर आणि पार्टी पुणे, पद्मावती कलाकेंद्र आणि पार्टी मोडनिंब, सोलापूर या संघांनीही लावणीचा बहारदार कार्यक्रम सादर करुन रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. रविवार व सोमवारीही सायंकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत लावणी महोत्सव चालणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांमुळेच कला सादर करण्याची संधी
गेली २ वर्षे कोरोनामुळे आम्हा लोककलावंतांवर आभाळच कोसळले होते. एक वेळ खाण्याचीसुद्धा भ्रांत होती. मात्र, कोरोनाची तिसरी लाट ओसरताच राज्य सरकार व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या लावणी महोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली. याचा मनापासून आनंद होत आहे. खरे तर रसिक प्रेक्षकांच्या आशिर्वादाशिवाय आम्ही कलावंत जिवंतच राहू शकत नाही. त्यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे आभार.

– सविता जळगावकर, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 − 18 =