August 19, 2022

लातूर शहरात डेंग्युचे ४६ संशयित रुग्ण

Read Time:6 Minute, 33 Second

लातूर : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असतानाच आता डेंग्युच्या तापाने नागरिकांची झोप उडवली आहे. ‘डंख छोटा, धोका मोठा’, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आपल्या लहान मुला-मुलींना डेंग्यूच्या डंखापासून कसे दुर ठेवता येईल, याची सतत चिंता पालकांना आहे. लातूर शहरात आजघडीला डेंग्यूचे ४६ रुग्ण संशयीत असून एक रुग्ण डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत माले यांनी ‘एकमत’शी बोलताना दिली. असे असले तरी शहरातील जवळपास सर्वच लहान मुलांच्या खाजगी हॉस्पिटलस्मध्ये बालकांची व पालकांची गर्दी दिसून येत आहे.

गेल्या दीड वर्षांपासून लातूर शहरातील नागरिक कोरोना विषाणुच्या विरोधात लढत आहेत. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. कोरोनाची पहिली लाट त्रासदायक होती तर दुसरी लाट भयंकर होती. या दोन्ही लाटेत काही नागरिकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले. कोरोनाशी लढाई सुरुच असताना आता डेंग्यूचा ताप वाढला आहे. पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबके साचले आहेत. शिवाय घराघरातून साठवलेल्या शुद्ध पाण्यात डेंग्युच्या ‘एडिस एजिप्ती’ या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातील लहान मुलांच्या खाजगी हॉस्पिटलस्मधील वाढत्या रुग्णसंख्येवरुन हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी हाच यावरील उपाय आहे.

डासोत्पत्ती होणार नाही, या अनुषंगाने सर्वांनी आरोग्य विभागाने सांगीतलेल्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. डेंग्यूचा संशयीत रुग्ण आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, तसेच शहरातील सर्वच खाजगी हॉस्पिटलसी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या डेंग्यू संशयीत, डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची साथरोग नियंत्रणांतर्गत ही माहिती महानगरपालिका आरोग्य विभागास तात्काळ द्यावी, असे पत्र शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटलस्ना देण्यात आल्याचे डॉ. प्रशांत माले म्हणाले. शहरात आजघडीला डेंग्यूचे ४६ संशयीत तर एक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सांगीतले.

२८ हजार ५०४ घरांतील पाण्यात टाकले अबेट
डेंग्यूसह इतर साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी लातूर महानगरपालिका प्रशासनाने शहरात दि. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत अबेट व धुरफवारणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत महानगरपालिकेचे २१२ कर्मचारी कार्यरत आहेत. मोहीम सुरु झाल्यापासून १ सप्टेंबरपर्यंत शहरातील २८ हजार ५०४ घरांना भेट देऊन या घरांतील पाण्यात अबेट औषध टाकण्यात आले आहे.

एडिस डासाची उत्पत्ती कशी रोखावी?
एडिस डासाची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, परिसर स्वच्छ-घरभोवती, परिसरात ज्यामध्ये पणीसाचू शकेल, अश निरुपयोगी वस्तू साचू देऊ नये, त्या नष्ट कराव्यात, खराब टार्यस, पंक्चर करावेत, पंक्चर दुकानातील टायर्स त्यात पाणी साठणार नाही, अशा पद्धतीने रचावेत, कीटकनाशक अबेटचा वापर करावा, गप्पिमाश्यांचा वापर करावा. पाणीसाठे मोकळे करावे, परंतू, ते पाणी गटारात न ओतता जमिनीवर ओतावे, पाणीसाठा मोकळा करणे शक्य नसल्यास त्यात अळी नाशकाचा वापर करावा, पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास पणी गाळून घेऊन ते पाणी पुन्हा वापरावे. तत्पूर्वी ते भांडे फडक्याने घासून पुसून ठेवावे.

डेंग्यू ताप म्हणजे काय?
> डेंग्यू ताप हा एडिस डासामुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे.
> ताप येणे, डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, पाठदुखी, स्नायुत वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची लक्षणे आहेत.
> डेंग्यूच्या एडिस डासाच्या पायावर पांढरे पट्टे असतात म्हणून त्याला ‘टायगर मॉस्क्यूटो’, असेही म्हणतात.
> हा डास दिवसा चावतो आणि म्हणूनच केवळ आपल्या घरीच नव्हे तर शाळा, कार्यालये, हॉटेल कोठेही तो चावू शकतो.
> हा डास लोंबकळणा-या वस्तू उदा: दोरी, लाईटची वायर, छत्री, काळेग कपडे, इतर ठिकाणी विश्रांती घेतो.
> या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात.
> वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामधून पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास अळी असलेली भांडी घासून पुसून धुवून स्वच्छ ठेवावीत, जेणेकरुन भांड्यांचे पृष्टभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 5 =

Close