लातूर विभागात निलंबनाचा धडका सुरूच

Read Time:3 Minute, 11 Second

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांचे गेल्या महिना भरापासून शासकीय सेवेत समावून घ्यावे या मागणीसाठी संप सुरू आहे. तर दुसरीकडे सरकार कर्मचा-यांना कामावर रूजू व्हा, अन्यथा निलंबनाला सामोरे जा, या भूमिका पहायला मिळत आहेत. संपकरी कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी लढा देत असताना लातूर विभागातून दररोज कर्मचा-यांच्या निलंबनाचा धडका सुरू आहे. सोमवार दि. २९ नोव्हेंबर रोजी लातूर विभागातील १०१ एसटी कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे. हा निलंबनाचा आकडा आता २८७ वर जाऊन पोहचला आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांच्या विविध मागण्यासाठी लातूर विभागीय कार्यालया समोर दि. २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस विविध संघटनांनी उपोषण केले होते. गुरूवार २८ ऑक्टोबर रोजी रात्री संघटना व प्रशासनाच्या वाटाघाटीत कांही मागन्य मान्य करून संप मिटल्याचे जाहिर करण्यात आले होते. मात्र एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी आम्हाला शासकीय सेवेत कायम समावून घ्यावे, या मागणीसाठी २९ ऑक्टोबर पासून संप सुरूच ठेवला आहे. या संपाला महिना उलटून गेला तरी कर्मचा-यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने लालपरी आगारातच धूळखात उभी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कोटयावधी रूपयांचा आर्थिक फटका बसत आहे.

लातूर विभागातील एसटी कर्मचा-यांनी कामावर रुजू होवुन प्रवाशी व विद्यार्थी यांची गैरसोय दूर करावी, असे आवाहन लातूरचे विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांनी केले होते. या आवाहनाला कांही प्रशासकीय व यांत्रीकी विभागातील कर्मचा-यांनी प्रतिसाद देत सेवेत रूजू झाले. मात्र अन्य कर्मचारी संपात सहभागी झाल्याने त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे.

गेल्या १५ दिवसात ६९ जणांचे निलंबन करण्यात आले होते. दि. २६ नोव्हेंबर रोजी ७ कर्मचा-यांचे निलंबन, दि. २७ नोव्हेंबर रोजी ११६ कर्मचा-यांचे निलंबन, तर दि. २९ नोव्हेंबर रोजी १०१ एस. टी. कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे एस. टी. कर्मचा-यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

two − two =