
लातुरात पत्नीचा गळा चिरून खून. पती फरार, २ वर्षांचे बाळ झाले पोरके
लातूर : धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना शहरातील बार्शी रोडवरील अवंतीनगर भागात मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. त्यानंतर पती फरार झाला. या घटनेने खळबळ उडाली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. खुनाच्या घटनेने २ वर्षांचे बाळ पोरके झाले आहे.
अवंतीनगर भागातील रेश्मा अब्दुल शेख (२२) हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी विवेकानंद चौक भागात राहणा-या तरुणाशी झाला होता.
गेल्या दोन वर्षांपासून पती-पत्नीत सातत्याने वाद होत असे. एवढेच नव्हे, तर पती रेश्माचा सातत्याने तिचा छळ करायचा. या छळाला कंटाळून रेश्मा अब्दुल शेख आपल्या २ वर्षांच्या बाळासह आई-वडिलांकडे अवंतीनगर येथे राहात होती. मंगळवारी तिचा पती सासरी आला आणि सायंकाळच्या सुमारास घरी एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले आणि गळा चिरून तिची हत्या केली. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ््यात पडली. त्यानंतर पती फरार झाला. याची आजूबाजूला कसलीच कुणकुण नव्हती. मात्र, रक्ताने माखलेले लहान बाळ घरातून बाहेर आले. ते पाहिल्यानंतर गल्लीतील काही लोकांनी घरात जाऊन पाहिले असता रेश्मा रक्ताच्या थारोळ््यात पडलेली होती.
या प्रकरणाची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यात देताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला. तिला २ वर्षांचा मुलगा आहे. तो पोरका झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
तक्रारीची दखल न घेतल्याने मुलीचा बळी
जावई आपल्या मुलीचा सातत्याने छळ करीत होता. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अनेकदा तक्रार दिली. परंतु या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे माझ्या मुलीचा जीव गेला अन्यथा माझी मुलगी वाचली असते, असा आरोप रेश्माच्या वडिलांनी केला.