लस न घेणा-यांसाठी कोरोना अधिक घातक!

Read Time:5 Minute, 11 Second

वॉशिंग्टन : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना लस घेणे आवश्यक आहे. परंतु ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना कोरोना झाल्यास तब्बल ११ पट अधिक मृत्यूचा धोका आहे. त्यामुळे कोरोना लस न घेणे अत्यंत घातक असल्याचे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) म्हटले आहे. कोरोनाशी संबंधित तीनवेळा अभ्यास करून त्यासंबंधीचा निष्कर्ष जारी केला असून, देशात लसीकरणावर भर देण्यास सांगितले आहे.

कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरत आहे. लस घेतल्यानंतर कोरोना संक्रमणाचा धोका ब-यापैकी टळू शकतो. त्यापेक्षाही मृत्यूचा धोकादेखील अधिक प्रमाणात टळू शकतो, ही बाब आतापर्यंतच्या ब-याच अभ्यासातून स्पष्ट झाली आहे. परंतु अमेरिकेतील आरोग्य एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शनने कोरोनाची लस न घेणे अधिक घातक असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर मृत्यूचा धोका ११ पट वाढू शकतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.

सीडीसीचा तीनवेळचा अभ्यासही अमेरिकेतच झाला आहे. एप्रिल ते जुलैदरम्यान १३ अमेरिकी प्रांतात कोरोनाच्या ६० हजारपेक्षा अधिक लोकांचा अभ्यास केला. ज्यांचे लसीकरण झालेले नाही, अशा लोकांवर अधिक लक्ष दिले गेले होते. त्यावेळच्या अभ्यासात लस घेतलेल्यांपेक्षा लस न घेतलेल्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका साडेचार पट अधिक पाहायला मिळाला. त्यामुळे लस न घेतलेल्या लोकांना कोरोनादेखील झटपट होऊ शकतो. अर्थात, तात्काळ लागण होऊन त्यांना मृत्यूचादेखील धोका असतो, असे यातून समोर आले होते.

रुग्णालयात दाखल करण्याची जोखीम अधिक
ज्यांनी लस घेतलेली नाही, अशी व्यक्ती कोरोना बाधित झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची जोखीम १० पट अधिक असते, असेही अभ्यासातून समोर आले आहे, तर मृत्यूचा धोकादेखील ११ पट वाढतो. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्येदेखील लस प्रभावी ठरली आहे. लस घेतल्यानंतर ६५ वर्षांवरील व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याचा ८० टक्के धोका टळतो, तर १८ ते ६४ वर्षांदरम्यानच्या नागरिकांना ९५ टक्के धोका नसतो, असे सीडीसीचे संचालक रोशेल वालेंस्की यांनी म्हटले आहे.

यांना घ्यावा लागणार बुस्टर डोस
कोरोना लसीकरण केल्यानंतरही काही लोकांमध्ये अ‍ँटीबॉडी पातळी कमी होत असल्याचे आढळून येत आहे. लसीकरण मानवी शरीरात अ‍ँटीबॉडी क्षमता वाढविण्याचे काम करते. परंतु लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अ‍ँटीबॉडी पातळी कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ज्यांच्या शरीरात लसीकरणानंतरही अ‍ँटीबॉडी पातळी कमी आहे, अशा लोकांना बुस्टर डोसची आवश्यकता भासेल, असे एका संशोधनाच्या आधारे तज्ज्ञाने सांगितले आहे.

२० टक्के लोकांमध्ये अ‍ँटीबॉडी तयार नाहीत
कोरोना लसीकरणानंतर २० टक्के लोकांच्या शरीरात कोविड १९ विरोधात अ‍ँटीबॉडी तयार झाल्या नाहीत, असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. भुवनेश्वरच्या रिसर्च युनिटच्या २३ टक्के स्वयंसेवकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले. परंतु त्यांच्या शरीरात अ‍ँटीबॉडी पातळी आधीसारखीच राहिली. त्यामुळे कमी अ‍ँटीबॉडी असलेल्या लोकांना बुस्टर डोस दिला जाऊ शकतो, अशी शिफारस भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सचे संचालक डॉ. अजय परिदा यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × one =