
लसीकरण झालेल्यांना विनामास्क फिरण्याची मुभा; अमेरिकेसाठी सर्वात मोठा दिवस
राष्ट्राध्यक्षांनी मास्क उतरवला…
मेरिकेत कोरोनाबाबत नवी नियमावली आल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी आपल्या कर्मचा-यांसह व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात मास्क उतरवला.
वॉशिंग्टन : अमेरिकेसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे. कारण अधिका-यांच्या सूचनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मास्क काढला आहे. लस घेतलेले लोक आता गर्दी नसलेल्या ठिकाणी विनामास्क फिरु शकतात, अशा सूचना अधिका-यांनी दिल्या आहेत. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांनी मास्क काढण्यास हरकत नाही, असे अधिका-यांचे म्हणणे आहे़ त्यानंतर जो बायडन यांनी अमेरिकेसाठी हा सर्वात मोठा दिवस असल्याचे म्हटले आहे़
नव्या नियमांनुसार, अमेरिकेतील नागरिक आता खुल्या किंवा बंद ठिकाणी, जिथे गर्दी नाही तिथे विनामास्क फिरु शकतात. मात्र गर्दीची ठिकाणे असलेल्या बंद जागा जसे की बस, विमान प्रवास, रुग्णालये, प्रार्थनास्थळे अशा ठिकाणी मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांनी बायडन प्रशासनावर कोरोना नियम कमी करण्यासाठी दबाव आणला होता. लसीकरणामुळे अमेरिकत कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. त्याशिवाय अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्स लेबर युनियननेही येत्या काळात शाळा सुरु करण्याची शिफारस केली आहे. १२ ते १५ वर्षांच्या मुलांना फायजर लस देण्यास मंजुरी मिळाल्याने, ही शिफारस करण्यात आली आहे.