January 25, 2022

लसींसोबत आणखी २ औषधे बाजारात!

Read Time:5 Minute, 33 Second

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा शरीरावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी लसींसोबतच आता आणखी दोन औषधे रुग्णांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत. ही दोन्ही औषधे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या मदतीने विविध संस्था आणि औषध बनविणा-या कंपन्यांसोबत मिळून तयार केले जात आहेत. या दोन्ही औषधाची पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे.

देशात एकीकडे लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारने देशात मोफत लसीचे धोरण सुरू केल्यानंतर २१ जूनपासून देशभरात मोफत लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे लसीकरणाला वेग आला होता. मात्र, लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने सध्या लसीकरणाची मोहीम काही अंशी मंदावली आहे. त्यातच लसींसोबतच आता औषधही उपलब्ध होणार असल्याने कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही औषधांची पहिली आणि दुसरी क्लिनिकल चाचणी पूर्ण झाल्याने हे औषध भारतीयांसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर लसीकरणासोबतच औषधाचा वापर करून रुग्णांना दिलासा देता येऊ शकणार आहे.

कोरोना रुग्णांसाठी पुढील काही महिन्यांत हे दोन्ही औषधे उपलब्ध होतील, असा अंदाज केंद्र सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने ओरल मेडिसिन उमीफेनोवीर विकसित केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि सीएसआयआरच्या वैज्ञानिकांच्या मते या औषधाची क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. परंतु अद्याप काही औपचारिकता बाकी आहे. या औषधाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर बाजारात लॉंच केले जाईल, असे सांगण्यात आले.

दोन्ही औषधांच्या दोन क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याने आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने या औषधांच्या मान्यतेसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या दोन्ही औषधाला लवकरच आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळू शकते, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मान्यता मिळाल्यानंतर हे दोन्ही औषधे तात्काळ बाजारात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यातून कोरोनाला नियंत्रित करणे अधिक सोपे जाणार आहे.

मोलानुपिरवीरचे नवे तंत्रज्ञान विकसित
उमीफेनोवीर या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने विकसित केलेल्या औषधासोबतच सीएसआयआर आणि एनआयआयएसटीने बाजारात याआधीच उपलब्ध असलेले अ‍ँन्टिव्हायरल औषध मोलानुपिरवीरचे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. सीएसआयआर आणि एनआयआयएसटीसोबत कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले औषध बनविणारी कंपनी ऑप्टिमस फार्मा मेडिसिनला बाजारात लॉंच करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात येत आहे.

हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचीही गरज नाही
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही औषधांची क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. औषध बनविणारी कंपनी ऑप्टिमस फार्माने तर औषधाच्या क्लिनिकल चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून, या चाचणीतून ज्या रुग्णांना ते दिले, त्यांचा केवळ मृत्यूचाच धोका टाळला नाही, तर त्यांना रुग्णालयातदेखील दाखल करण्याची वेळ आली नाही.

औषध नियंत्रकाच्या मान्यतेची प्रतीक्षा
या औषधांच्या आपत्कालीन वापरासाठी औषध बनविणा-या कंपनीने भारतीय औषध महानियंत्रकाकडे (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्ज दिला आहे. ही दोन्ही औषधे बाजारात येतील. निश्चितपणे रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या आधी डीआरडीओने टू डीजी औषध रुग्णांसाठी हॉस्पीटलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 1 =

Close