लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून ११ जणांचा मृत्यू; सीडीएस बिपीन रावतांवर उपचार सुरु

Read Time:2 Minute, 48 Second

तामिळनाडू: बुधवारी भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर एमआय १७ व्ही ५ कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह ९ ते १४ जण होते. वेलिंग्टन आर्मी सेंटर या ठिकाणी ही घटना घडली. अपघातात ११ जणांचे मृतदेह सापडले आणखी तिघे गंभीर जखमी आहेत. दरम्यान बिपीन रावत यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

निलगिरी पर्वत रांगामध्ये बुधवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली. घटनास्थळी पोलिस तातडीने पोहोचले व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुरीका, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आदी ९ ते १४ जण होते. हे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या तळावरून कुन्नूरकडे जात होते. कोइम्बतूर आणि सुलूर दरम्यान ते जंगलात कोसळल्याची माहिती आहे. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.

सध्या मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व मृतदेहांची ओळख करण्यात येत आहे. दरम्यान दिल्लीत कॅबिनेटची बैठक सुरू असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना घटनेची माहिती दिली आहे. हेलिकॉप्टरमध्ये ४ क्रू मेंबर्ससह १० प्रवासी होते. रावत यांच्यासह ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी सई तेजा, हवालदार सतपाल यांची नावे समोर आली आहे. दरम्यान, थोड्याच वेळात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लोकसभेत घटनेची माहिती देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटना कशी घडली? याची चौकशी करण्यासाठी तामिळनाडू सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 − 14 =