January 19, 2022

रेल्वे सेवा होणार पूर्ववत

Read Time:2 Minute, 30 Second

विशेष रेल्वे, वाढीव तिकीट रद्द, सर्वच रेल्वे धावणार
नवी दिल्ली : जवळपास दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. भारतालाही याचा मोठा फटका बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमित रेल्वे गाड्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्याऐवजी केंद्र सरकारने विशेष रेल्वे सेवा सुरू केली होती. परंतु आता कोरोनाची महासाथ नियंत्रणात आल्याने रेल्वे मंत्रालयाने नियमित रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुढील काही दिवसांत १७०० पेक्षा अधिक रेल्वे नियमित ट्रेन म्हणून पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत.
यासंदर्भात रेल्वेने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार प्री कोविड असलेले तिकीट दर लागू करण्यात येणार आहेत. म्हणजेच ज्या विशेष तिकीट दरानुसार विशेष रेल्वे सुरू केल्या होत्या, त्याचे दर आता सामान्य होणार आहेत. याचाच अर्थ आता जनरल तिकीट असलेली पद्धत संपणार आहे. आता केवळ रिझर्व्ह आणि वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. जनरल क्लासचे कोणतेच तिकीट आता मिळणार नाही. तसेच यापूर्वी बुक करण्यात आलेल्या तिकीटांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच कोणतेही पैसे परतही करण्यात येणार नाहीत, असेही सांगण्यात आले.
कोरोना काळात करण्यात आलेले बदल आता हळूहळू कमी करण्यात येत आहेत. परंतु कोरोनाचे प्रोटोकॉल मात्र पाळावे लागणार आहेत. नियम तोडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, असेही सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 4 =

Close