June 29, 2022

राष्ट्रहितासाठी संघटित होण्याची गरज

Read Time:3 Minute, 31 Second

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्राचे हित साधण्यासाठी समाजामध्ये एकता व सामंजस्य असले पाहिजे. पण आज जात व धर्माच्या नावावर विघटन केले जात आहे. हे सर्व भेद विसरून, मानवता हा एकच धर्म लक्षात घेत एकत्रित येण्याची गरज आहे. राष्ट्र हितासाठी समाजाने संघटित होण्याची गरज आहे, असे मत सु.श्री.रामप्रियाश्रीजी अर्थात माई यांनी व्यक्त केले.

भारतीय शिक्षण संस्था संचलित श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या वतीने राष्ट्र चेतना शिबिरात ग्रामगीता प्रणित राष्ट्रभक्ती सत्संगात मार्गदर्शन करताना रामप्रियाश्रीजी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या व्यक्तीधर्म, कुटुंबधर्म, समाज धर्म, बळकट होईल राष्ट्रधर्म या तत्वाला अनुसरून विश्लेषण केले. सत्संगाच्या समारोप प्रसंगी माईंनी व्यक्तीधर्म सांगताना स्वत:साठी वेळ देण्याचे आवाहन केले. चांगल्या विचाराने दिवसाचा प्रारंभ करा .दररोज किमान एक तास ध्यान करा. जीवनाला जिवंत करण्यासाठी प्रसन्न रहा, असे त्या म्हणाल्या. तसेच कुटुंब धर्माचे पालन करत आपला परिवार आदर्श बनवा. घराला स्वर्ग करण्यासाठी प्रयत्न करा, यातूनच समाज धर्मही साधला जातो. दहशतवादी देशाला पोखरण्याचा प्रयत्न करत आहेत. वाईट काम करणा-यांचे संघटन लवकर होते. परंतु राष्ट्रहितासाठी सर्वांनी आज संघटित होण्याची गरज आहे.

जातीयवाद सोडून एकत्र येणे आवश्यक आहे. अशा स्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची खरी गरज असल्याचे त्या म्हणाल्या. आपण खूप पैसा खर्च करतो पण तो कुठे खर्च करावा ? हे लक्षात आले पाहिजे. चांगल्या कामाचे, राष्ट्र सेवेचे व्यसन लावून घ्या, असे त्या म्हणाल्या. आपण ऋषीपुत्र आहोत. भारतमातेचे पुत्र आहोत. भारतमातेसाठी वीर पुरुषांनी त्याग केला आहे. विद्यार्थ्यांनी रोज किमान एका महापुरुषाच्या चरित्राचे वाचन करावे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती राजश्री कुलकर्णी तर ऋणनिर्देश बालासाहेब केंद्रे यांनी केले. रेनिसन्स सीबीएसई स्कूलच्या प्रांगणात तीन दिवस चाललेल्या या सत्संगाचा विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. सत्संगानंतर शिवकालीन चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven − ten =

Close