राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल

Read Time:3 Minute, 35 Second

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडल्यानंतर राज ठाकरेंना त्यांची वक्तव्य भोवणार असल्याची शक्यता आहे. याआधी ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलिसांनी तात्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचेउल्लंघन झाल्याचं समोर आल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. मात्र राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास सरकारनेही संघर्षाची तयारी ठेवावी, असे मनसेच्या संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंने आज शेवटचा दिवस असल्याचे म्हणत मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज शिवतीर्थावर बैठक बोलावली. याआधीच मनसेच्या कार्यकर्त्यांना १४९ नुसार नोटीसा देण्यात आल्या आहेत. यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. याआधी त्यांनी पोलिस महासंचालकांसोबत बैठक घेतली.

सांगली प्रकरणात ठाकरेंना वॉरंट
२००८ साली राज ठाकरे यांनी कल्याणमध्ये सभा घेतली होती. यावेळी त्यांनी काही भडकाऊ वक्तव्य केल्याचे समोर आले होते. राज ठाकरे यांनी काही वादग्रस्त विधाने केल्याचाही आरोप झाला. यावेळी सांगलीच्या शिराळ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले होते. या पदाधिका-यांवरही कारवाई झाली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख होता. महिनाभरापूर्वी शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. मात्र महिनाभरापासून पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पाच ते दहा वर्षांपूर्वीच्या केसेस निकाली काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत. त्यानुसार ही प्रकरणे आतापर्यंत मार्गी लागणे आवश्यक होते. मात्र, अद्याप कारवाई न झाल्याने कोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. त्याआधीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक बोलावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

15 − eight =