June 29, 2022

राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळेची घंटा वाजणार

Read Time:3 Minute, 42 Second

मुंबई : गणेशोत्सवानंतर अद्याप तरी रुग्णसंख्या फारशी वाढलेली नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन शाळा करण्यात येणार आहे. इयत्ता ५ वीपासूनचे पुढील वर्ग सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिका-यांकडे सर्व निर्णय राहतील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद असणा-या शाळा सुरु होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून, रुग्ण बरे होणा-यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच आता शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिका-यांचे अधिकार राखीव : राज्यमंत्री कडू
एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या ४ तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटते ब-याच जिल्ह्यात वातावरण चांगले आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिका-यांना अधिकार राहतील, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना : पारेख
राज्य शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील, असे चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी मत व्यक्त केले होते. चाइल्ड टास्क फोर्सकडून ज्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला दिल्या गेल्या आहेत, त्याबाबतची तयारी करून राज्यभर एकत्रित शाळा सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने शाळा सुरू करणे योग्य ठरेल, असेही बकुळ पारेख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 4 =

Close