राज्यात सर्वदूर पाऊस; मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला

Read Time:7 Minute, 53 Second

मुंबई : सध्या राज्याच्या विविध भागांत पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतही चांगला पाऊस सुरू असल्याचे दिसत आहे.

लातूर आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग
मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीलायक पाऊस झाला नव्हता. शुक्रवारी सकाळपासून अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. संध्याकाळनंतर मात्र पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.

हिवरा येथील पूल वाहून गेला
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे हिवरा (जगताप) येथील अजनसरालगत असलेला हिवरा येथील पूल वाहून गेला आहे. अचानक पूल वाहून गेल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरून घर जवळ करावे लागत आहे.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

नांदेड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस; नदी, नाल्यांना पूर
नांदेड जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नांदेड, अर्धापूर, हदगाव, बिलोली, धर्माबाद, उमरी, किनवट, मुखेड, मुदखेड, नायगाव या नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. तर शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अर्धापूरमधील नदी, नाल्यांना पूर येऊन नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. तर नांदेड शहरातील कौठा, सिडको, श्रावस्ती नगर, जुना कौठा, तरोडा नाका परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे अर्धापूर तालुक्यातील छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर येऊन सेलगाव, देगाव, गणपूर, कोंढा, मेंढला या ब-याच गावांचा संपर्क तुटला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात ७८ मिलीमीटर पावसाची नोंद
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून बळिराजाला दमदार अशा पावसाची प्रतीक्षा होती. अखेर नंदुरबार जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत नंदुरबार जिल्ह्यात दमदार असा पाऊस झाला असून, या हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक ७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे बळिराजा समाधानी झाला आहे.

हिंगोलीत ढगफुटीसदृश पाऊस
हिंगोली जिल्ह्यातील कृष्णा भागामध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. रात्रभर झालेल्या पावसाने गावाजवळ असलेल्या आसना नदीला पूर आला आहे. हे पाणी नदीपात्रातून थेट गवात शिरले आहे. गावातील सर्वच घरांत हे पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

वाशिम जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
वाशिम जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत मुसळधार
रत्नागिरी जिल्ह्यात ९ जुलै ते १२ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच रायगडमध्येही चांगला पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये देखील चांगला पाऊस सुरू आहे.

महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक भरले
सातारा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तर पाचगणीला पाणीपुरवठा करणारे वेण्णा लेक भरले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागात चांगला पाऊस
अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक तालुक्यांमध्ये संततधार पाऊस झाला. सुमारे चार तास संततधार पावसाने हजेरी लावल्याने काही भागातील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. गेल्या एक आठवड्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असला तरी अहमदनगरच्या दक्षिण भागात म्हणावा असा पाऊस झालेला नव्हता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी पाऊस झाल्याने शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील जवळपास सर्वच तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × one =