August 19, 2022

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार

Read Time:3 Minute, 57 Second

पुणे : अखंड जून महिना पावसाशिवाय कोरडा गेला. मात्र आता पावसाने जूनची कसर जुलै महिन्यात भरून काढली असल्याचे चित्र आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून राज्यभरात ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

मागील आठवडयापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सुरुवातीला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार पाऊस झाला नाही. परंतु आता राज्यासह देशातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबईसह इतर भागांत कोसळणा-या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने चार दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अत्यावश्यक कामांसाठी घरातून बाहेर पडण्यास सांगितले आहे.

विजांच्या कडकडाटांची दाट शक्यता
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबईसह कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना गेल्या २४ तासांत पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. शनिवारी मुंबईत रेड अ‍ॅलर्ट जारी केला होता. मात्र मुंबईत केवळ २.२ मिमी पावसाची नोंद झाली असून ही दिलासादायक बातमी आहे.

प्रभावित जिल्ह्यातून अनेकांना हलविले
महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील १३० गावांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील गडचिरोली, ंिहगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यातील काही नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत २०० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

अनेक ठिकाणची वाहतूक बंद
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने आदेशाद्वारे नागरिकांना समुद्र किना-यावर जाण्यास मनाई केली आहे. बीएमसी कमिशनर इक्बाल सिंग चहल यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, शहरातील समुद्रकिना-यांना सकाळी ६ ते सकाळी १० या वेळेतच भेट देता येणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त मुसळधार पावसाचा परिणाम दक्षिणेकडील तेलंगणा राज्यावर झाला आहे. येथील अनेक रस्ते पाण्याखाली असल्याने वाहतूकीसाठी बंद झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 + 6 =

Close