राज्यात टप्प्याटप्प्याने लसीकरण?

Read Time:3 Minute, 25 Second

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाच्या तिस-या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार काही राज्यांनी हे लसीकरण सुरू केले. महाराष्ट्रातदेखील त्याची मोजक्या केंद्रांवर सुरुवात करण्यात आली. मात्र, लसींचा तुटवडा आणि त्यातून होणारा गोंधळ लक्षात घेता आता राज्य सरकार १८ ते ४४ या वयोगटाच्या लसीकरणात वेगवेगळे स्लॉट करून त्यानुसार लसीकरण करण्याची शक्यता आहे. हे स्लॉट वयोगट किंवा सहव्याधी यानुसार असू शकतात, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्यानुसार प्रथम ३५ ते ४४ वयोगटाला प्राधान्य मिळू शकते.

आरोग्य मंत्री टोपे यांनी शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लसींचा साठा अपुरा असल्याने केंद्रांवर लसींचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात आहे. या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य सरकारने मोजक्या केंद्रांवरच लसीकरण सुरू केले आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर या वयोगटातील नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, त्याविषयी काही समस्या येत असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

१८ ते ४४ वयोगटासाठी ग्रामीण भागातील केंद्रांवर त्याच भागातील लोक न जाता मेट्रो शहरांमधून ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे अशा लोकांनी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेतले. त्यामुळे स्थानिक भागात अस्वस्थता निर्माण झाली. ही समस्या सोडवण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्लॉट द्यावे लागणार आहेत. मग वयोगटाचा किंवा कोमॉर्बिडिटीचा स्लॉट देता येईल. म्हणून ३५ ते ४४ या वयोगटातील लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल, असे टोपे म्हणाले.

स्पुटनिकसाठी चर्चा सुरू
राज्यात लसीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रशियाची स्पुटनिक लस मागवण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राजेश टोप यांनी दिली. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत बोलणी सुरू आहेत, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen − 2 =