राज्यात आयकरच्या धाडी

Read Time:2 Minute, 54 Second

मुंबई : राज्यात जवळपास ४० ठिकाणी आज आयकर विभागाने धाडी टाकल्या असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांचे चार्टर्ड अकाऊंटंटसह इतर निकटवर्तीय आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे. ४० ठिकाणी सुरू केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये २५ निवासस्थाने, कार्यालये आणि पंचतारांकित हॉटेल्स आहेत. याशिवाय कर्नाटकातही धाडी टाकण्यात आल्या. या धाडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याशी संबंधित नातेवाईकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला.

पुण्यातील उद्योजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात ४० ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, जालना, यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने मुंबई, पुणे, नागपूरसह जवळपास ४० ठिकाणी हे छापे टाकले. मुंबईतील एका हॉटेल्सच्या काही सुट्सवरही छापे टाकण्यात आले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवरही छापा टाकण्यात आला. यात त्यांच्या ३ बहिणींशी संबंधित कंपन्या असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यतिरिक्त कर्नाटक, बेंगळुरू येथेही आयकर विभागाचे छापे टाकले.

याआधी आयकर खात्याने मुंबईत ५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पहाटे ५ वाजल्यापासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. यात परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली. संजय मानजी कदम हे शिवसेना पदाधिकारी आहेत. त्यांच्या अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील १६ व्या मजल्यावरील घरावर छापे टाकले. संजय कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या निवासस्थानीही आयकर विभागाने छापे टाकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 + seven =