August 19, 2022

राज्यातील ५६ हजार लोककलावंतांना सरकारचा दिलासा, प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देणार

Read Time:3 Minute, 48 Second

मुंबई, दि.६ (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते आर्थिक संकटात सापडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या बैठकीत अडचणीत आलेल्या कलाकारांना दिलासा देण्यासाठी पॅकेज देण्यास मान्यता देण्यात आली. याबाबतचा विस्तृत प्रस्ताव लगेच राज्य मंत्रिमंडळासमोर आणावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान येथे सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपथित होते. गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास ८ हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्हयात जवळपास ४८ हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार ५ हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास २८ कोटी रुपये खर्च होणार आहे. समूह लोककलापथकांचे चालक मालक आणि निर्माते यांनाही एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थि संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी, दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास ८४७ संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी ६ कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी १ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × five =

Close