August 19, 2022

राज्यातील विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी आता ५ हजार रूपये मिळणार

Read Time:3 Minute, 27 Second

पुणे : राज्यातील २३ जिल्ह्यांतील १२५ अतिमागास तालुक्यांत ‘मानव विकास कार्यक्रम’ राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, या अंतर्गत राबविल्या जाणा-या विविध योजनांमध्ये ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ कि. मी. अंतरापर्यंत राहणा-या गरजू मुलींना सायकलींचे वाटप करण्यासाठी योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. सुरूवातीला ३ हजार रूपये अनुदान होते. त्यात नंतर ५०० रूपयांची वाढ केली होती. आता १६ फेब्रुवारी रोजी आणखी दीड हजार रूपये वाढवून ५ हजार रूपये करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे.

लाभार्थी मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी ३ हजार रूपये इतकी रक्कम आरटीजीएसद्वारे लाभधारक मुलीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यास डीबीटी मान्यता दिली आहे. त्यानंतर २३ मार्च २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रति लाभधारक मुलींसाठी रकमेत वाढ करून ती ३ हजार ५०० रूपये इतकी, तर आता प्रति लाभार्थी ५ हजार रूपये इतके करण्यास मान्यता दिली आहे.

कशी मिळणार सायकल…
* पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयकृत बँक खात्यात डीबीटीद्वारे ३ हजार ५०० रूपये आगाऊ रक्कम जमा करण्यात येईल.
* दुस-या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरीत १ हजार ५०० रूपये इतके अनुदान थेट डीबीटीद्वारे खात्या जमा करण्यात येईल.
* गरजू मुली ज्या शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा, तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रमशाळेमधील मुलींना डे-स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये-जा करावी लागत आहे.
* गरजू मुलींना ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शालेय शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वायत्तता राहिल व त्यांना या चार वर्षामध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान देय राहणार आहे.
* गरजू मुलींना सायकल वाटप करताना पूर्वीच्या निकषांसोबतच जी गावे/ वाड्या/तांडे/पाडे हे डोंगराळ व अतिदुर्गम भागात आहेत व जिथे जाण्यासाठी सुयोग्य रस्ते नाहीत तथा वाहतुकीची पुरेशी साधने/व्यवस्था उपलब्ध नाही, अशा ठिकाणी राहणा-या गरजू मुलींना प्राधान्य देण्याचे शासनाने आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − seven =

Close