
राज्यातील नेत्यांवरच कारवाई का?
भाजपचे नेतेच केंद्राकडे नावे पाठवतात, सत्ता गेल्याने अस्वस्थता : पवार
नागपूर : महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेले येथील भाजपवाले सत्ता पक्षातील नेत्यांच्या याद्या केंद्राकडे पाठवतात आणि केंद्र सरकार त्यांच्यामागे तपास यंत्रणेचा ससेमिरा लावते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे वर्धमाननगरातील सातवचन लॉन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलन सोहळ््यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अटक, एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी, अजित पवार यांच्या बहिणीच्या घरावर पडलेले छापे, हसन मुश्रीफांवरील आरोप, संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी यावरून पवार यांनी भाजप आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याच्या अस्वस्थतेतून हे सगळे चालले असल्याचा आरोप पवार यांनी केला. ‘ज्या माणसाने आयुष्याची ३० ते ३५ वर्ष भाजपचे काम निष्ठेने केले. विधीमंडळात पक्षाची भूमिका मांडली अशा माणसावर भाजपने अन्याय केला. त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे नमूद करत एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवर पवार यांनी टीकास्त्र सोडले. अल्पसंख्याकांचे नेतृत्व करणाºया हसन मुश्रीफसारख्या माणसाला त्रास दिला जात आहे. अजित पवारांना लक्ष्य केले जाते. ते बधत नाही हे बघून त्यांच्या बहिणीला त्रास दिला जातो. त्यांच्या घरी २०-२० माणसे येऊन झडती घेतात. तासन्तास ठाण मांडून बसतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत काही करता येत नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला चौकशीस बोलावले गेले, असे नमूद करत तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याबद्दल पवार यांनी सडकून टीका केली.
ज्या पोलिस आयुक्तांनी अनिल देशमुखांवर आरोप केले ते आज कुठे आहेत, हे कुणालाच माहिती नाही. कोर्टाने त्यांना फरार म्हणून घोषित केले आहे. असा माणूस आज बाहेर फिरतो आहे आणि केंद्र सरकारने अनिल देशमुखांना तुरुंगात टाकले आहे. देशमुखांच्या प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची किंमत जनता तुमच्याकडून वसूल करेल, असा इशारा पवार यांनी दिला. मी नेहमी विदर्भात आलो की अनिल देशमुख असायचे. हा माझा विदर्भाचा असा पहिला दौरा आहे, ज्यात अनिल देशमुखांची कमी जाणवते. त्यांना देण्यात आलेली प्रत्येकी जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
सध्याचे केंद्र सरकार एखाद्या राज्यात सत्ता न मिळाल्यास केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करते. राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षातील नेत्यांच्या मागे केंद्र सरकारच्या वेगवेगळ््या तपास यंत्रणा लावून त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र करीत आहे, असा आरोपही पवार यांनी केला.
पटेलांचा नाना पटोलेंवर निशाणा
शरद पवारांच्या आशीर्वादाने अनिल देशमुख नक्कीच बाहेर येतील, असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. येणाºया महापालिका निवडणुका आपण पूर्ण ताकदीनिशी लढवू. विधानसभेतसुद्धा यंदा आपण शहरात किमान दोन मतदारसंघ लढवू आणि ग्रामीण भागातसुद्धा आपण हिंगणा आणि काटोलखेरीज इतर ठिकाणी आपली ताकद दाखवून देऊ, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. आजकाल लोकं स्वबळाची भाषा करीत आहेत. आपणही तयारी ठेवायला हवी. गरज पडल्यास सगळ््या जागा लढवू, या शब्दांत पटेलांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे नाव घेता त्यांचा समाचार घेतला.