राज्याच्या विविध भागात ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’; नागरिकांचा चांगला प्रतिसाद

Read Time:6 Minute, 42 Second

मुंबई : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक ११वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले. यावेळी नागरिकांनी आहे त्या ठिकाणीहून उभे राहून राष्ट्रगीताचे गायन केले. दरम्यान, यामध्ये सर्व नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्याप्रमाणे राज्याच्या विविध भागात राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आले.

यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं देशात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात आली. आज सकाळी ११ वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचे गायन झाले.

या राष्ट्रगीताच्या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी सहभाग घेतला. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्णयक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, सरकारने सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी सामूहिक राष्ट्रगीत गायन अनिवार्य केले होते. राष्ट्रगीतासाठी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात एकत्र येण्यास सांगण्यात आलं होतं.

राज्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिली होती. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय जारी केला होता. तसेच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने यासंबंधी परिपत्रक देखील जारी करण्यात आलं होतं.

संगमनेर येथे सामुहिक राष्ट्रगीताचे गायन
संगमनेर बसस्थानकासमोर शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गात शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. ११ वाजता राष्ट्रगीताला सुरवात होताच परिसरातील सर्व व्यावसायिक, ग्राहक यांनी सहभाग घेत राष्ट्रगीताला साथ दिली.

परभणी शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांचा सामुहिक राष्ट्रगीताला चांगला प्रतिसाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ११वाजता सर्वत्र सामूहिक राष्ट्रगीत करण्याच आवाहन केलं होतं. या आवाहनाला परभणीकरांनीही मोठा प्रतिसाद दिला. परभणी शहरासह जिल्हाभरातील शाळा महाविद्यालय विविध ठिकाणी आज अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत गाण्यात आलं. विविध संघटना,पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला.

मुलुंडमध्ये पोलिसांसह, सामाजिक संस्थानी केलं राष्ट्रगीताचे सामूहिक गायन
मुंबई पोलिसांच्या परिमंडळ सात चे डीसीपी प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड मध्ये सामूहिक राष्ट्रगीत म्हटले गेले. मुलुंड पोलीस ठाण्यासमोर मुलुंड पोलीस , स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्था यांनी एकत्र येत राष्ट्रगीत म्हटले. या वेळी रस्त्यावरून जाणारी वाहने थांबवून ही या उपक्रमात सहभागी झाले. नागरिकांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसाद बद्दल डीसीपी कदम यांनी नागरिकांचे आभार मानले.

नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही सामूहिक राष्ट्रगीताचे गायन
राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. जिल्हाधिकारी आर विमला यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले होते. शासनाच्या अशा उपक्रमातून सर्वांना एकत्रित आणले जाते. संघटित करते आणि त्यामुळे अशा उपक्रमाचे वेगळं महत्व असते असे मत जिल्हाधिकारी आर विमला यांनी व्यक्त केले.

जळगाव जिल्ह्यात सर्व ठिकाणी देशभक्तीचा जागर
जळगाव जिल्ह्यात समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम पार पडला. जिल्हयातील सर्व तालुके, सर्व गावे, सर्व शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, खाजगी संस्था अशा सर्व ठिकाणी झालेल्या या राष्ट्रगीताच्या गायनातून देशभक्तीचा जागर करण्यात आल्याचे यावेळी पहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 5 =