
राज्यस्तरीय लघुपट महोत्सव
निलंगा : येथील महाराष्ट्र महाविद्यालयात महाराष्ट्र महाविद्यालय कॅम्पस फिल्म सोसायटी निलंगा अभिजात फिल्म सोसायटी लातूर आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय लघुपट महोत्सवाचे आयोजन दि. ११ व १२ एप्रिल दरम्यान झाले .
महोत्सवाचे उद्घाटन मुंबई येथील सिने समीक्षक व दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात एकूण १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर हे उपस्थित होते. मंचावर अभिजात फिल्म सोसायटीचे सचिव श्याम जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपुके, उपप्राचार्य डॉ. सी. जे. कदम, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. पी. पी. गायकवाड हे उपस्थित होते.
यावेळी पठारे म्हणाले की, चित्रपट ही मनोरंजनाची बाब नसून त्या त्या काळाचा, संस्कृतीचा आणि समाजाचा एक आरसा म्हणून पाहता येऊ शकतो.. या प्रसंगी प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपुके यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव एक पर्वणी असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात विजय पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान तसेच साहित्य आणि कला या विषयातील अत्याधुनिक ज्ञान उपलब्ध करून देणे हेच संस्थेचे उद्दीष्ट आहे,असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक महोत्सवाचे समन्वयक डॉ. डी. एस. चौधरी यांनी केले. महोत्सवातील मान्यवरांचे आभार सहसमन्वयक डॉ. बी. एस. गायकवाड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. एन. व्ही. पिनमकर यांनी केले. दुस-या सत्रात लातूर येथील सिने अभ्यासक व रंगकर्मी डॉ. संतोष कुलकर्णी यांनी चित्रपट रसग्रहणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
लघुपटावरील चर्चासत्राचे समन्वयक म्हणून डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. एच. डी. भोसले, डॉ. ए. एम. मुळजकर, व डॉ. एन. व्ही. पिनमकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तरूण दिग्दर्शक, लेखक व सिनेमॅटोग्राफर आदित्य केळगावकर यांचा ‘साऊंड प्रूफ’ हा लघुपट दाखविण्यात आला. या चर्चेसाठी आदित्य केळगावकर हे उपस्थित होते. या दोन दिवसीय लघुपट महोत्सवात विद्यार्थ्यांनी एकूण ४० लघुपट पाहिले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. सी. जे. कदम हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य केळगावकर यांची उपस्थिती होती. मंचावर अभिजात फिल्म सोसायटी, लातूरचे उपाध्यक्ष डॉ. स्वप्नील देशमुख, अभिजित भूमकर, उपप्राचार्य प्रा. पी. पी. गायकवाड हे उपस्थित होते. केळगावकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप डॉ. सी. जे. कदम यांनी केला. आभार समन्वयक डॉ. डी. एस. चौधरी व डॉ. बी. एस. गायकवाड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. जी. जी. शिवशेट्टे यांनी केले.या महोत्सवासाठी तांत्रिक सहाय्य प्रा. काकडे, सिध्देश्वर कुंभार, नामदेव गाडीवान, दत्ता माने,. पवन पाटील, सुहास माने,
ज्ञानेश्वर खांडेकर, उमाजी तोडकर यांनी परिश्रम घेतले.