August 19, 2022

राजकीय तिरंदाजी!

Read Time:10 Minute, 50 Second

टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारताने आणखी चार पदके मिळवून एकूण विक्रमी पदकसंख्या १९ वर नेऊन पदकतालिकेत २४ वे स्थान मिळवले. यात ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. रविवारी (५ सप्टेंबर) स्पर्धेची सांगता होत आहे. भारतीय पॅरा-खेळाडूंची ही स्फूर्तीदायक कामगिरी पाहून राजकीय क्षेत्रालाही स्फूर्ती मिळाली असावी असे दिसते. गत वर्षापासून विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नावर सध्या जी तिरंदाजी सुरू आहे ती पाहता हा समज अधिकच दृढ होतो. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांची गतवर्षी एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपली. नव्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून यादी पाठवण्यात आली. त्यावर राज्यपालांनी निर्णय न घेता हे प्रकरण प्रलंबित ठेवले. त्यावरून राज्यपाल विरुद्ध सरकार असा वाद धुमसत राहिला.

मंत्रिमंडळाने १२ सदस्यांच्या नावांची यादी अंतिम मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ती यादी पाठविण्यात आली. त्यालाही आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लोटला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये नेहमीच खडाजंगी होत आली आहे. राज्यातील विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने सत्ताधा-यांकडून राज्यपालांना वारंवार लक्ष्य केले गेले आहे. त्याबाबत राज्यपालांनीही खोचक प्रतिक्रिया दिली होती. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारही उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांकडे १२ सदस्यांच्या नियुक्तीविषयी विचारणा केली तेव्हा अजित पवारांकडे हात दाखवून राज्यपाल म्हणाले, ‘हे माझे मित्र आहेत. सरकार आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता?’ यावर अजित पवारांच्या चेह-यावर हास्य उमलले होते.

राज्यपालांच्या उत्तरासंबंधी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, आज स्वातंत्र्यदिन आहे, या विषयावर नंतरच बोलेन. त्यानंतर सदस्य नियुक्ती लवकरच होईल असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते. उच्च न्यायालयाने सुद्धा या प्रश्नी आम्ही राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही, ते आपले कर्तव्य पार पाडतील असे मत व्यक्त केले होते. सदस्य नियुक्तीचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी १ सप्टेंबर रोजी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यामुळे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंबंधी लवकरच तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे, काँगे्रसचे रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसेन, अनिल बनकर तर शिवसेनेचे ऊर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. पण आता या निमित्ताने एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी राज्यपालांकडे करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याचे वृत्त आले आणि त्यावरून एकमेकांवर तिरंदाजी सुरू झाली.

शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना राष्ट्रवादीतर्फे संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत राष्ट्रवादीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती. परंतु या चर्चेवरून संतप्त होत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. दिलेला शब्द पाळायचा की पुन्हा एकदा खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवावे. पण आता मी देखील या पक्षाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला. गत अडीच वर्षापासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून लोकांच्या मनातील माझे स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही. या स्थानावरच आम्ही शब्द न पाळणा-यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे शरसंधान शेट्टी यांनी केले. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, राजू शेट्टी यांना आम्ही दिलेला आमदारकीचा शब्द पाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना देण्यात आलेल्या यादीत राजू शेट्टी यांचे नाव आहे. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे, ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावे असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही.

एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांनी घ्यायची असताना अशा प्रकारची विधाने कशी केली जातात याचे मला आश्चर्य वाटते असे शरद पवार म्हणाले. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे. त्यावर राजू शेट्टींनी काय वक्तव्य केले त्यावर मला भाष्य करायचे नाही. शरद पवार यांच्या खुलाशावरून एकूण प्रकार ‘बाजारात तुरी…’ असाच वाटतो. अर्थात राष्ट्रवादीची आजवरची चालचलन पाहता ‘काय खरं, काय खोटं’ असा संभ्रम जनतेच्या मनात कायम असतो. दुसरा एक मतप्रवाह असा की, राजू शेट्टी यांनी सत्ताधा-यांवर केलेली टीका त्यांना भोवली असावी. राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीच्या मुद्यावर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोर्चे काढले होते. तसेच जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील आदी मंत्र्यांवर टीका केली होती. शेट्टी यांचा बदललेला रोख लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने त्यांच्या आमदारकीची शिफारस रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शक्यतो शिफारस करू नये असाही एक मतप्रवाह आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीचे यशवंत भिंगे, शिवसेनेच्या ऊर्मिला मातोंडकर यांचे नावही वगळावे लागेल.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावालाही आक्षेप घेतला जाऊ शकतो. राज्यपाल कोणती भूमिका घेतात यावर सारे काही अवलंबून आहे. राष्ट्रवादीबरोबर झालेल्या समझोत्यातून आमदारकी देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यामुळे मेहेरबानी म्हणून आपल्या पक्षाला आमदारकी देण्यात येत नव्हती अशी राजू शेट्टींची भूमिका आहे. आघाडी सरकारने राज्यपालांकडे दिलेल्या १२ नावांमध्ये कोणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही असे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मग डोळ्यावर पट्टी बांधून हत्तीला शेपूट लावण्याचा खेळ का खेळला जातोय? या निमित्ताने आ. सदाभाऊ खोत यांनीही राजू शेट्टींवर शरसंधान साधले आहे. आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टी यांची काशी झाली आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 − seven =

Close