यूरोप पेटले!

Read Time:5 Minute, 0 Second

लंडन : ब्रिटनमध्ये तापमानाने पहिल्यांदाच ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सध्या ब्रिटनमध्ये उष्णतेचा तांडव पहायला मिळत आहे. या उष्णतेचा त्रास आता दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ३९ अंशांवर पोहोचला असल्याने नागरिकांच्या जीवनावर याचा परिणाम जाणवू लागला असून आरोग्यासाठी हे हवामान घातक असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी दक्षिण पश्चिम लंडनमध्ये तापमान ४०.२ वर पोहोचले होते.

ब्रिटनमध्ये पारा आजपर्यंत कधीच चढला नव्हता. सध्याचे तापमान पाहता ते १०४.४ अंशापर्यंत पोहोचले आहे. यामुळे २०१९ मधील १०१.६ अंशाचा पूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. त्यामुळे हा दिवस आतापर्यंत देशातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याऐवजी त्याचा त्रास आणखी वाढू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

देशाच्या अनेक भागांतून वेगवेगळ्या वेळी तापमानाची नोंद केली जात आहे. त्यामुळे खरा आकडा खूप मोठा असू शकतो, असे सांगण्यात आले आहे. लंडनमध्ये रात्रीचे तापमानही २६ अंश सेल्सिअस नोंदवले जात असून लंडनचे हवामान बहुतेक रात्री थंडकिंवा आल्हाददायक असते, परंतु यावर्षी त्यात मोठा बदल झाला आहे. ब्रिटनमध्ये या उन्हाळ्यात तांडव सुरू असल्याने नागरिक नाराज आहेतच, पण वाहतूक सुविधाही कोलमडली आहे. वाहतूक सचिव ग्रँट शॅप्स यांच्या मते, ब्रिटनची रेल्वे ही उष्णता सहन करण्याइतकी प्रगत नाही.

रेड अ‍ॅलर्ट जारी
सध्याची परिस्थिती अशी आहे की, कडक उन्हामुळे हवामान खात्याला अनेक भागांसाठी रेड अ‍ॅलर्ट जारी करावा लागला आहे. सध्या उत्तर आणि दक्षिण लंडनच्या अनेक भागात रेड अ‍ॅलर्ट सुरू असून, उष्णतेमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मोठी गोष्ट म्हणजे या कडक उन्हापासून वाचण्यासाठी पाच जणांनी नदीच्या साहाय्याने दुस-या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्वजण बुडाले.

राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात : बायडन
जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असणा-या अमेरिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील महागाईचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे. सोबतच अमेरिकेला हवामान बदलाचा देखील मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा करत यावर चिंता देखील व्यक्त केली आहे.

युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये उष्णतेच्या लाटा पसरत असताना हवामान बदलाचा सामना करण्याबाबत बायडन यांनी भाष्य केले. बायडन म्हणाले की, अमेरिकेतील १०० दशलक्ष लोक सध्या अत्याधिक उष्णतेचा सामना करत आहेत. हा हवामान बदल एक स्पष्ट आणि सध्याचा मोठा धोका आहे. हवामान आपत्तींना तोंड देण्यासाठी यूएस पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २.३ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह कृती कार्यक्रमाची घोषणा करत असल्याचं बायडन म्हणाले. बायडन म्हणाले की, आपल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आपली राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात आहे आणि आपली अर्थव्यवस्था धोक्यात आहे. त्यामुळे आपल्याला ही तत्काळ कार्यवाही करावी लागणार आहे. ही एक प्रकारची आणीबाणी आहे आणि मी त्याकडे त्यादृष्टीने पाहीन. अध्यक्ष या नात्याने मी माझ्या कार्यकारी अधिकारांचा वापर हवामानाच्या संकटाचा सामना करण्यासाठी करेन, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 1 =