July 1, 2022

यूपी सरकारच्या जाहिरातीत कोलकात्यातली चित्रे

Read Time:3 Minute, 41 Second

लखनौ : द इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रात दि. १२ सप्टेंबर उत्तर प्रदेश सरकारच्या विकासाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, ही जाहिरात सोशल मीडियावर ट्रोलिंगचे कारण बनली आहे. ट्रान्सफॉर्मिंग उत्तर प्रदेश अंडर योगी आदित्यनाथ (योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये बदलते उत्तर प्रदेश) या मथळ्याची ही जाहिरात पूर्ण पानभर छापण्यात आली आहे.

या जाहिरातीत गगनचुंबी इमारती, फ्लायओव्हर आणि चकचकीत रस्ते अशा गोष्टी दाखवण्यात आले आहेत. या जाहिरातीत लिहिले आहे की, सन २०१७ च्या आधी गुंतवणुकीबाबत बाहेरील लोक उत्तर प्रदेशवर हसत असत. मात्र, गेल्या साडेचार वर्षात आम्ही उत्तर प्रदेशच्या या नकारात्मक प्रतिमेला बदलले. मात्र, ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही फॅक्ट चेकर्सनी त्यातील एका गोष्टीकडे लक्ष वेधले की, जाहिरातीत छापण्यात आलेल्या इमारती आणि फ्लायओव्हर उत्तर प्रदेशातील नाहीत, तर पश्चिम बंगालमधील आहेत. विशेष म्हणजे, या जाहिरातीत कोलकात्यात चालणा-या काळी-पिळी टॅक्सीही दाखवण्यात आली आहे. या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ हे सोशल मीडियावर टीकेचे लक्ष्य बनले. लोकांनी प्रश्न विचारले की, उत्तर प्रदेशचा विकास दाखवण्यासाठी भाजप सरकारकडे स्वत:च्या कामाचा फोटो नाहीय का?

राजकीय नेत्यांकडून टीकास्त्र
या जाहिरातीची सोशल मीडियावरून खिल्ली उडवली गेलीच, त्याचसोबत राजकीय वर्तुळातूनही टीका झाली. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा म्हणाल्या, योगींच्या उत्तर प्रदेशातील जाहिरातीत कोलकात्यातील एमएए फ्लायओव्हर आहे. आमचे जे डब्ल्यू मॅरियट आणि प्रसिद्ध काळी-पिळी टॅक्सीही आहे. आता तुमची नियत बदला किंवा जाहिरात एजन्सी तरी! मोईत्रा यांनीही असेही म्हटले की, आता मी नोएडात माझ्याविरोधात तक्रार होईल, याची वाट पाहतेय.

द इंडियन एक्स्प्रेसकडून माफीनामा
सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातून यूपी सरकारच्या या जाहिरातीवर टीका सुरू झाल्यानंतर द इंडियन एक्स्प्रेसने माफी मागणारे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये म्हटले की, वृत्तपत्राने उत्तर प्रदेशची जाहिरात बनवली होती, त्यात चुकून हे फोटो छापले गेले. आम्हाला या चुकीचं दु:ख आहे आणि हे फोटो वृत्तपत्राच्या सर्व ऑनलाईन आवृत्त्यांमधून हटवण्यात आलेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

seventeen − one =

Close