यूपीएससीत शुभम कुमार देशात पहिला

Read Time:3 Minute, 46 Second

नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा अशा अनेक देशपातळीवरच्या परीक्षांसाठी अधिका-यांची निवड करणा-या यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये शुभम कुमार देशात पहिला आला आहे. एकूण ७६१ उमेदवारांची यादी यूपीएससीकडून जाहीर करण्यात आली. भोपाळच्या जागृती अवस्थीने दुसरा क्रमांक पटकावला आहे, तर अंकिता जैनने तिसरा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. २४ वर्षीय जागृतीने इंजिनिअरिंग केले आहे. महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात ३६ वी आली असून विनायक नरवदे देशात ३७ वा आला आहे. ९५ व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे.

२०२० साली यूपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यूपीएससीच्या वेबसाईटवर हे निकाल पाहता येणार आहेत. नियमाप्रमाणे वेबसाईटवर आता फक्त निकाल पाहता येणार असून सविस्तर गुणपत्र १५ दिवसांत संकेस्थळावरच अपलोड केले जाईल, असे सांगण्यात आले.

७६१ उमेदवार उत्तीर्ण
एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २६३ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत. ८६ उमेदवार मागासवर्गातील, २२९ ओबीसी, १२२ अनुसूचित जाती तर ६१ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. याशिवाय १५० उमेदवार रिझर्व्ह यादीमध्ये आहेत. त्यामध्ये १५ आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील, ५५ ओबीसी, ५ अनुसूचित जाती तर एक उमेदवार अनुसूचित जमातीमधील आहे.

लातूरच्या नितीशा जगताप, पूजा कदम, निलेश गायकवाडचे यश
यूपीएससी परीक्षेत लातूर पॅटर्न पाहायला मिळाला असून, जिल्ह्यातील नितिशा जगताप, पूजा कदम आणि निलेश गायकवाड यांनी यश मिळविले आहे. विशेष म्हणजे नितिशा संजय जगताप या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नांत देशात १९९ वी रँक मिळविली. तसेच ग्रामीण भागातील टाका (ता. औसा) येथील पूजा कदमनेही या परीक्षेत यश मिळविले असून, त्यांनी राष्ट्रीय पातळीवरून ५७७ वी रँक मिळविली आहे. यासोबतच येथील निलेश श्रीकांत गायकवाड ६२९ व्या रँकने यश मिळविले असून, त्यांनी लातूरच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. गेल्यावर्षी ते यूपीएसी परीक्षेत भारतीय पातळीवरून ७५२ रँकने उत्तीर्ण झाले होते. संरक्षण सहाय्यक नियंत्रकपदी त्यांची नियुक्ती झाली होती. सध्या त्यांची ट्रेनिंग सुरु आहे. या यशस्वी उमेदवारांचे कौतुक होत आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनीही यशस्वी उमेदवार आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − seventeen =