July 1, 2022

युवराज सिंगला हरियाणामध्ये अटक व सुटका

Read Time:2 Minute, 27 Second

हांसी : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला हरियाणामधल्या हिसार पोलिसांनी अटक केली आहे. हांसी शहर पोलिस स्टेशनमध्ये युवराज सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागच्या वर्षी रोहित शर्मासोबत लाईव्ह चॅटवेळी युवराजने युझवेंद्र चहलवर अनुसुचित जातीबाबत अपमानजनक वक्तव्य केले, असा आरोप आहे. हांसी पोलिसांनी युवराजला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली. हिसार जियो मेसमध्ये त्याची चौकशी करण्यात आली. यानंतर हायकोर्टाने युवराज सिंगला जामीन दिला.

या प्रकरणी काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने युवराज सिंगच्या अटकपूर्व जामिनाचे आदेश दिले होते. यानंतर हांसी पोलिसांनी युवराजला औपचारिकरित्या अटक केली आणि त्याला काही प्रश्न विचारले आणि मग अटकपूर्व जामिनाच्या कागदांच्या आधारावर त्याची सुटका केली. युवराज सिंग हायकोर्टाच्या आदेशानंतर या चौकशीसाठी हिसारमध्ये आला होता. त्याच्यासोबत सुरक्षारक्षकांसह चार ते पाच कर्मचारी आणि वकीलही चंडीगढमधून हिसारमध्ये आले होते.

काही तासांच्या चौकशीनंतर तो पुन्हा चंडीगढला रवाना झाला. सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी युवराजविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती, यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये युवराजने अनुसुचित जातींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप दलित अधिकार कार्यकर्ते रजत कलसन यांनी केला होता.हा गुन्हा रद्द करण्यासाठी युवराजने हायकोर्टाचं दार ठोठावले होते, यानंतर हायकोर्टाने युवराजविरुद्ध पोलिसांच्या कारवाईवर बंदी आणली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × four =

Close