यंदाही गणेशोत्सव निर्बंधातच

Read Time:2 Minute, 51 Second

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असून २५ जिल्ह्यांमधील निर्बध राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे राज्य सरकार वारंवार खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळे यावर्षीही गणेशोत्सव उत्सव निर्बंधातच साजरा करावा लागण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना तसे संकेत दिले.

गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे सांगतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सव निर्बंधातच साजरा करावा लागेल, असे संकेत दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व पंढरपूरचा दाखला देत पवार म्हणाले की, जिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, तिथे पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्क्यांच्या आसपास आहे, तर जिल्ह्यातल्या अन्य ठिकाणी जिथे गर्दी नव्हती, तिथे हा दर एक टक्क्याच्या आत आहे. त्यामुळे उत्साहाला आवर घालण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.

पुण्यात निर्बंध शिथिल
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यातील सर्व दुकाने एक दिवस वगळता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील हॉटेल-रेस्टॉरंट सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण मॉल्समध्ये फक्त २ लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, तर हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागात अजूनही पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याने तिथे लेव्हल तीनचे नियम लागू असणार आहेत, असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + sixteen =