
मोदींच्या सुरक्षेत त्रुटी? ताफा अडवला, पंतप्रधान नाराज, पंजाबमधील रॅली रद्द
चंदीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौ-यात सुरक्षेत चूक झाल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली. आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांचा ताफा रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाच्या दिशेने निघाला. परंतु उड्डाण पुलावर शेतक-यांनी आंदोलन करून ताफा अडविला. त्यामुळे पंतप्रधान मोदींना फ्लायओव्हरवरच अडकून राहावे लागले. ही सुरक्षेतील मोठी चूक होती. यावरून आता भाजप-कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होती. सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसामुळे ते रस्ते मार्गाने निघाले. त्यावेळी फ्लायओव्हरवर शेतकरी आंदोलकांनी त्यांचा ताफा रोखला. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. परंतु शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा अडवला. त्यामुळे पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागले.
पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार त्यांची सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था पंजाब सरकारला करावी लागणार होती. त्यामुळे पंजाब सरकारला रस्त्याने पंतप्रधानांचा दौरा सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसे घडले नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याची कल्पना असताना आणि पंजाब पोलिसांकडून सुरक्षेचे आश्वासन दिलेले असताना इतकी मोठी घोडचूक झाल्याने आता भाजपाकडून पंजाब सरकार व काँग्रेसवर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सुरक्षेत मोठी त्रुटी राहिल्याने पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे.