मुलांच्या लसीकरणाचे फायदे कमी, जोखीम जास्त!

Read Time:6 Minute, 9 Second

नवी दिल्ली : देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांना ३ जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. ओमिक्रॉन या नवीन कोरोना व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, देशात लहान मुलांना लसीकरण करावे की नाही, याबाबत बराच काळ वाद सुरू होता. रविवारी एम्सचे वरिष्ठ डॉक्टर संजय के. राय यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी या निर्णयाला अवैज्ञानिक म्हणजेच अशास्त्रीय म्हटले आहे. डॉ. राय हे एपिडेमियोलॉजिस्ट आणि इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

हा निर्णय लागू करण्यापूर्वी ज्या देशांत मुलांना लसीकरण केले जात आहे, त्या देशांच्या डेटाचा अभ्यास केला पाहिजे, जिथे मुलांना आधीच लसीकरण केले जात आहे. जर आम्ही जोखीम आणि लाभाचे विश्लेषण केले, तर तुम्हाला असे दिसून येईल की लहान मुलांना लसीकरण करण्याचे फायदे कमी आहेत आणि जोखीम जास्त आहे. कोव्हॅक्सिनची चाचणी एम्समध्ये प्रौढ आणि मुलांवर सुरू आहे. डॉ. राय हे या ट्रायलमध्ये तपासनीस आहे.

पंतप्रधान कार्यालयाला केलेल्या ट्विटमध्ये डॉ. राय यांनी लिहिले की, देशासाठी नि:स्वार्थ सेवेसाठी आणि वेळेवर निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा चाहता आहे, परंतु मुलांच्या लसीकरणाच्या त्यांच्या अवैज्ञानिक निर्णयामुळे मी निराश झालो आहे. शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलांना ३ जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाईल, असे घोषित केले. यामुळे शाळा आणि महाविद्यालयीन मुलांच्या पालकांची चिंता संपुष्टात येईल आणि साथीच्या रोगाविरुद्धच्या लढाईत मदत होईल, असेही ते म्हणाले होते.

कोणत्याही निर्णयामागे हेतू असला पाहिजे. कोरोनाची लस लागू करण्यामागे एक हेतू असायला हवा, जसे की संसर्ग रोखणे, रोगाची तीव्रता कमी करणे किंवा मृत्यूचा धोका. लसींबद्दल आपल्याकडे असलेल्या थोड्या माहितीनुसार लस संसर्ग रोखण्यासाठी फारशा प्रभावी नाहीत. अनेक देशांमध्ये बूस्टर डोस घेतल्यानंतरही लोकांना संसर्ग होत आहे. ते म्हणाले की, ब्रिटनमध्ये दररोज ५० हजारांहून अधिक संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. यावरून हे सिद्ध होते की, लसीकरण कोरोना संसर्ग रोखत नाही. तथापि, संसर्गाची तीव्रता कमी ठेवण्यासाठी आणि मृत्यू रोखण्यासाठी ही लस प्रभावी आहे.

लस प्रौढांसाठी फायदेशीर, मुलांसाठी नाही
डॉ. राय म्हणाले की, कोरोनामुळे प्रौढांच्या मृत्यूचे प्रमाण १.५% आहे. म्हणजेच १० लाख लोकसंख्येमध्ये १५ हजार मृत्यू होऊ शकतात. लसीकरणाद्वारे आपण ८०-९० टक्के मृत्यू रोखू शकतो, म्हणजेच १३ हजार ते १४ हजार मृत्यू टाळू शकतो. लस घेणा-या दशलक्ष लोकांपैकी फक्त १० किंवा १५ लोकांमध्ये गंभीर दुष्परिणाम किंवा मृत्यू होतो. अशा स्थितीत ही लस प्रौढांसाठी फायदेशीर ठरते.

मुलांना संसर्ग कमीच
मुलांच्या बाबतीत संसर्गाची तीव्रता खूपच कमी आहे आणि आमच्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार १० लाख लोकसंख्येमध्ये फक्त २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुलांच्या बाबतीत १५ हजार मृत्यू होत नाहीत. जर तुम्ही जोखीम आणि फायद्याचे विश्लेषण केले तर तुम्हाला असे दिसून येईल की, मुलांना लसीकरण करण्याचे फायदे कमी आहेत आणि जोखीम जास्त आहे. अशा परिस्थितीत मुलांना लस देऊन कोणताही उद्देश पूर्ण होत नाही.

अमेरिकेची आकडेवारी तपासा
अमेरिकेसह काही देशांमध्ये ४-५ महिन्यांपूर्वी मुलांना लसीचे डोस द्यायला सुरुवात झाली आहे. या देशांची आकडेवारी पाहिली पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून मुलांना लस द्यावी की नाही, हे ठरवावे.

लस मुलांसाठी सुरक्षा कवच : डॉ. सुरेश कुमार
दिल्लीचे लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) हॉस्पिटलचे एमडी डॉ. सुरेश कुमार यांचे मत डॉ. राय यांच्यापेक्षा वेगळे आहे. त्यांच्या मते १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लसीचा डोस मिळाला तर ते त्यांच्यासाठी संरक्षणात्मक कवच असेल. कोरोनाच्या नवीन प्रकारापासूनही मुलांना धोका होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × two =