मुख्यमंत्र्यांना शेतक-याने रक्ताने लिहिले पत्र

Read Time:2 Minute, 55 Second

आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, मदत न मिळाल्याने संतप्त सवाल

हिंगोली : मुख्यमंत्री साहेब, आम्ही महाराष्ट्रात राहतो का बिहारमध्ये, असा संतप्त सवाल सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतक-याने रक्ताने पत्र लिहून विचारला आहे. या तालुक्यातील ३ मंडळातील शेतक-यांना मदतीपासून वगळल्यामुळे त्याने हे पत्र पाठविले असून सर्व शेतक-यांना मदत देण्याची विनंती केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत ९५ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, तर त्यानंतर सतत झालेल्या पावसामुळे पिके हातची गेली. प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणातून अतिवृष्टीमुळे १.३१ लाख शेतक-यांचे १.१० लाख हेक्टरचे नुकसान झाले. या शेतक-यांना मदतीसाठी १५४ कोटी रुपयांची मदत लागणार आहे. शासनाने ही मदतदेखील जाहीर केली आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यात ४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली नसल्याचे शेतक-यांंना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

या प्रकारानंतर सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी नामदेव पतंगे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. मदतीपासून मंडळातील शेतक-यांना वगळल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. अनेक शेतकरी अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मंडळातील शेतक-यांंना मदत न मिळाल्यामुळे आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये राहतो, असा प्रश्­न उपस्थित करण्यात आला आहे. अधिवेशनात शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही, अशी घोषणा केली होती. मग हे काय आहे. खाजगी फायनान्स कंपन्या शेतक-यांना नाकीनाऊ आणीत असून, आता जगायचे कसे ते सांगा अन्यथा उर्वरित रक्ताने अभिषेक करून आमचे जीव सोडून देऊ, असेही या पत्रात नमूद केले आहे. सदरील पत्र सेनगावच्या तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine − 9 =