June 29, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

Read Time:2 Minute, 36 Second

गेल्या काही दिवसांपासून मानेचा आणि मणक्याचा त्रास जाणवत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रूग्णालयात दाखल झाले असून, पुढील दोन ते तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च ही माहिती दिली असून, जनतेच्या आशिर्वादाने माझी तब्येत लवकरच बरी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

त्याचवेळी ज्यांचा लसीचा दुसरा डोस बाकी असेल, त्यांनी तातडीने तो घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून मानेचा आणि मणक्याचा त्रास जाणवत होता. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे त्यांना क्षणभराचीही उसंत मिळालेली नाही. त्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. यामुळेच त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतच ही माहिती दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत.

एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकास कामे सुरूच राहावीत, म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणले तरी थोडंसे दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

7 − one =

Close