महिलांच्या योजना, कायदे आणि संरक्षण संदर्भात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा


 

 

नांदेड- नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्ह्यातील विद्यार्थीनीपासून ते गृहिणी पर्यंत, परितक्तापासून कामगार महिलांपर्यंत सर्वांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी योजनांची सर्वदूर प्रसिद्धी व लाभ देण्याचे लक्षांश वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

यासोबतच राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामुहिक सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची पुनर्रचित बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली 4 जुलै रोजी करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीमती रेणुका तम्मलवार, तसेच जिल्ह्यातील प्रांत अधिकारी हे ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.

या बैठकीमध्ये महिलांसाठी असणाऱ्या वैयक्तिक व सामूहिक योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये हुंडा पद्धतीच्या विरोधात जनजागृती करणे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणे, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाच्या प्रकरणांचा आढावा, महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा, देहविक्री करणाऱ्या महिलांच्या विविध मागण्यांचा आढावा, अपराधी परिविक्षा अधिनियमाची चर्चा, मिशन शक्ती, एक छत्री योजनेंतर्गत योजनांची चर्चा, पोलीस स्टेशन आवारात समुपदेशन केंद्रांचा आढावा, महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, राज्याचे मिशन वात्सल्य अभियान संदर्भात चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याबाबत जिल्हयातील महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय विविध योजना लोकाभिमुख करुन त्याची अंमलबजावणी करावी. महिला व बाल विकास विभागाच्या विविध बैठकीत वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी निश्चित करुन महिला व बालकांच्या संदर्भात योग्य ते जबाबदारीने काम करण्याच्या सुचना संबंधित विभागाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केल्या.

प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. रंगारी यांनी केले तर विविध विषयांच्या अनुषंगाने सादरीकरण जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांनी केले. बैठकीस समितीतील अशासकीय सदस्य, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 


Share this article:
Previous Post: महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 व 8 वी साठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस अंतिम मुदतवाढ

July 5, 2024 - In Uncategorized

Next Post: पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड निवड झालेली महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू

July 6, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.