January 21, 2022

महाराष्ट्र बंदला जनतेचा पाठिंबा

Read Time:8 Minute, 37 Second

मुंबई: लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळालं. मुंबईसह राज्यात अनेक भागात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचा दावा केलाय. सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जनतेने प्रतिसाद दिला. भाजपने बंदला विरोध केला. भाजप शेतक-यांच्या हत्तचे समर्थन करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा बंदला विरोध पाहता त्यांची भूमिका स्पष्ट होते. भाजप नेते रस्त्यावर आले नाहीत म्हणून त्यांना बंद कळाला नसेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.

मागील वर्षी नैसर्गिक आपत्ती झाली. त्याची पाहणी करायला केंद्राची टीम आता आली आहे. मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या भागाला मदत करण्याची सरकारची भूमिका आहे, असंही पटोले यावेळी म्हणाले. महाराष्ट्र बंदसाठी जबरदस्ती झाली असेल तर त्याचे समर्थन काँग्रेस करत नाही. ज्या कुणी जाळपोळ आणि बसची तोडफोड केली त्याचं आम्ही समर्थन करत नाही. ज्या कुणी जाळपोळ आणि बसेसची तोडफोड केली, त्याचे आम्ही समर्थन करत नाही. हा सरकारचा बंद नव्हता तर पक्षीय बंद होता, असं पटोले म्हणाले.

भाजपला सत्तेची मस्ती : सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माध्यमांनी पहिल्यांदा लखीमपूर हिंसाचाराचा व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना, असा सवालही सुळे यांनी केला. सरकार कुणाचेही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे.

विरोध म्हणजे शेतक-यांना चिरडून मारण्याचे समर्थन : जयंत पाटील
भाजपकडून या बंदला विरोध म्हणजे शेतक-यांना चिरडून मारण्याचे अप्रत्यक्ष समर्थन आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. तसेच, लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

… परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच : मनसे
अमेय खोपकर म्हणाले की, शेतक-याचां खरंच कळवळा असेल तर एक दिवसाचे उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा. निषेध म्हणून दोन तास अधिक काम करा. जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच. जनतेच्या जीवाशी खेळ करून राजकारणाची पोळी भाजण्याचा महाभकास आघाडीचा प्रयत्न सुरू आहे. ‘महाराष्ट्र बंद’ पुकारून राज्य सरकार काय साध्य करतंय? अशी टीका अमेय खोपकर यांनी केली.

मविआ सरकारचा ढोंगीपणा : फडणवीस
महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी पॅकेज जाहीर करतील किंवा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मविआ सरकार शेतक-यांबद्दल असंवेदनशील : दरेकर
खरच जर शेतक-यांबद्दल आपल्याला संवेदना असती, तर शेतक-याला आधार दिला असता. परंतु, शेतक-यांच्या नावावर राजकारण तुम्हाला करायचं आहे आणि तो शेतक-याचा आक्रोश, तो शेतक-याचा संताप आज महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भामध्ये दिसतोय. या सगळ्या गोष्टींपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हा नियोजित कार्यक्रम आहे.’ असा आरोप दरेकर यांनी यावेळी महाविकासआघाडीवर केला.

बंद शेतक-यांसाठीच : भुजबळ
मंत्री आणि मंत्रिपुत्र जे आहेत, ते आव्हान देतात काय? आंदोलन करणा-या लोकांच्या अंगावर गाड्या घालतात काय? यात फार मोठा फरक आहे. हा संप शेतक-यांसाठीच आहे. देशातल्या सगळ्या शेतक-यांना आम्ही समान समजतो. ते शेतकरी ज्यासाठी आंदोलन करतायत त्यात आपल्याकडच्या शेतक-यांचाही फायदाच आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे शेतक-यांना चिरडून मारू शकत नाही. हा एक संदेश आपल्याला यातून द्यायचा आहे.

केवळ मोजक्या व्यापारी संघटनांचा विरोध : नवाब मलिक
केवळ बोटावर मोजण्याएवढ्या भाजपाच्या व्यापारी संघटनांचा विरोध आहे. सगळ्या मोठ्या संघटनांनी बंदला समर्थन दिले आहे. राज्यभर दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा अडवण्यात आलेल्या नाहीत. भाजपाला विरोध करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र बंदला पांिठबा दिल्याने तो यशस्वी झालेला आहे.

जळगावात कार्यकर्ते एकमेकांना भिडले
वरणगाव (ता.भुसावळ) शहरामध्ये महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्­ये मारामारी झाली. यात अनेकजण जखमी झाले असून जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. े.

ठाण्यात मारहाण
ठाण्यात शिवसैनिकांकडून रिक्षाचालकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बंद मुळे बस बंद आहेत. रिक्षाचालक जास्त भाडे आकारत आहेत अशा तक्रारी नागरिकांकडून आल्या. त्यामुळे रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आल्याचे शिवसेना स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे.

लक्ष विचलित करण्यासाठी बंद : चंद्रकांत पाटील
राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसला, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + 8 =

Close