January 19, 2022

महाराष्ट्राला प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार

Read Time:5 Minute, 53 Second

स्कॉटलंडमध्ये सन्मान, अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनतर्फे सन्मान, ३ पैकी एका पुरस्काराने सन्मानित

ग्लासगो : महाराष्ट्राला अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अ­ॅक्शनकडून प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार मिळाला आहे. राज्यासाठी आनंदाची बाब म्हणजे स्कॉटलंडमध्ये अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अ­ॅक्शनतर्फे तीन पुरस्कारांपैकी एक जिंकणारे एकमेव भारतीय राज्य महाराष्ट्र ठरले आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारतामध्ये महाराष्ट्राला पुढाकार घ्यायचा आहे. मुख्यमंत्री हे उत्कट वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी आहेत आणि त्यांनी आम्हाला चांगल्या भविष्याची, हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. माझी वसुंधरा म्हणजेच माय प्लॅनेट नावाची चळवळ आम्ही सुरू केली आहे. आम्ही निसर्गाच्या पारंपरिक पाच घटकांवर लक्ष केंद्रित करत आहोत, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्लासगो येथे दिली.
राज्य सरकार स्वच्छ ऊर्जेकडे कसे पाहत आहे आणि औष्णिक किंवा कोळसा उर्जेसारख्या पारंपरिक उर्जेपासून दूर जात आहे, याबद्दलही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. नुकतेच आम्ही एका महामार्गाचे सोलराइजेशन केले आहे आणि आम्ही २५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार आहोत. आम्ही निविदा कागदपत्रे सादर केली आहेत आणि आम्ही मुंबई आणि नागपूरदरम्यानच्या नवीन महामार्गावरून २५० मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करणार आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. माझ्या नावाचा अर्थ आदित्य असाही होतो आणि भारतात आपण सूर्यदेवतेला विश्वाचे बीज म्हणून पूजत आलो आहोत. आपल्या बहुतेक प्राचीन ग्रंथांमध्ये सूर्यदेवाला प्राथमिक स्थान आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या सीओपी २६ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीपसाठी पुरस्कार मिळाला. आपल्या क्लायमेट पार्टनरशीपस् अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह क्लायमेट सोलुशनची येथे विशेष दखल घेतली. पर्यावरणाच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारही चांगले काम करीत आहे. या कामाची दखल घेऊन महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशात महाराष्ट्रालाच हा मान मिळाल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.
उप-राष्ट्रीय स्तरावर हवामान वाचवण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना अंडर २ कोलिशनने मान्यता दिली. जे राज्ये आणि प्रदेशांचे सर्वात मोठे जागतिक नेटवर्क हवामान कृतीसाठी वचनबद्ध आहे. इतर दोन पुरस्कार ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा) यांनी क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्ससाठी आणि क्­वेबेक (कॅनडा) यांनी हवामान भागीदारीसाठी जिंकले. महाराष्ट्राने (भारत) अंडर २ च्या तीनही श्रेणींसाठी प्रवेशिका दिल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावर
महाराष्ट्राची वेगळी ओळख
हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो. शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान आहे, असे आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
देशाच्या पर्यावरण
ध्येयास पुरस्कार समर्पित
स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या सीओपी २६ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीपसाठी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 3 =

Close