
महाराष्ट्रात पावसाचे थैमान, कोकणात हाहाकार, चिपळूणसह अनेक गावांना पुराचा वेढा
मुंबई,दि.२२(प्रतिनिधी) मागच्या आठवड्यापासून मुक्काम ठोकून बसलेल्या पावसाने काल रात्रीपासून रौद्र रूप धारण केल्याने कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. संपूर्ण चिपळूण पाण्यात असून आठ फुटापर्यंत पाणी वाढल्याने हजारो लोक पाण्यात अडकले आहे. रात्री उशिरा एनडीआरएफच्या तुकड्या तेथे पोचल्या असून बचावकार्य सुरू झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्कालीन बैठक घेऊन पुरस्थितीचा आढावा घेऊन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील तीन दिवस कोकणासह अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देताना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.
रविवारी मुंबईसह कोकणाला तडाखा देणाऱ्या पावसाने गेले दोन दिवस थोडी विश्रांती घेतली होती. मात्र बुधवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा रौद्ररुप धारण केले. कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुफान पाऊस झाला असून अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः, ठाणे, रायगड, रत्नागिरी या तीन जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. देशात चेरापुंजीनंतर सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात झाली असून ४० वर्षाचा विक्रम पावसाने मोडला आहे. गेल्या दहा दिवसात १७०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी व वशिष्टी नदीला पूर आल्याने खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरांना व या परिसरातील अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. पावसाने थोडीही उसंत न घेतल्याने पाण्याची पातळी वाढत असून हजारो लोक पुराच्या वेढ्यात अडकले आहेत. २००५ साली आलेल्या पुरापेक्षाही यावेळची स्थिती अधिक गंभीर आहे. या भागाकडे जाणारे सगळे रस्ते पाण्याखाली गेले असल्याने पुणे आणि मुंबईतून निघालेल्या एनडीआरएफची पथकं चिपळूणला पोचण्यासाठी रात्र झाली होती. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी , उल्हास या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून परिस्थिती बिकट झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातही स्थिती गंभीर
मुंबई शहरात यावेळी फारसा पाऊस नसला तरी शेजारच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे. उल्हास नदीला पूर आल्यामुळे बदलापूर शहरात पाणी शिरले आहे. अनेक इमारतीना पाण्याचा वेढा पडला असून इमारतीखाली व रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कल्याण, कर्जत, उल्हासनगर व भिवंडी शहरातील स्थितीही अशीच आहे.
मुंबईशेजारील वसई शहरातही पूरस्थिती असून पाणी तुंबल्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. कल्याण शहरासह शेजारील रायते, म्हारळ, कांबा, वरप आदी गावांना पुराचा वेढा पडल्याने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले व घराच्या छतावर आसरा घेऊन बसलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा
पुरस्थितीचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेऊन स्थितीचा व मदतकार्याचा आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात रेड व ऑरेंज अलर्ट दिला असल्याने, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
रेल्वेवाहतुक विस्कळीत, हजारो प्रवासी अडकले
कल्याण, कर्जत, बदलापूर येथे पुराच्या पाण्यामुळे तर कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने पुणे व नाशिककडे जाणाऱ्या लांब पल्याच्या गाडया दुपारपर्यंत वेगवेगळ्या स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या. तर रत्नागिरी जिल्ह्यातील पुरस्थितीमुळे कोकण रेल्वेबरोबरच मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूकही ठप्प झाली होती. यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले होते. याशिवाय दोन्ही मार्गावरील ४६ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.